23 September 2020

News Flash

गिरीश महाजन यांच्या भूमिकेमुळे भाजपमध्ये संभ्रम

महाजन हे वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी भाजपला ‘खाविआ’च्या दावणीला बांधत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांमधून होत आहे.

गिरीश महाजन

जळगाव महापालिका निवडणूक

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण, प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विद्यमान सत्ताधारी खान्देश विकास आघाडी (खाविआ) आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. निवडणुकीत भाजपने ‘खाविआ’शी युती करावी, यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन प्रयत्नशील आहेत. मात्र स्थानिक पातळीवर भाजपचा त्यास तीव्र विरोध आहे. भाजपचे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी ‘एकला चलो रे’चा नारा देत ‘मिशन फिप्टी प्लस’ तयारीला सुरुवात केली आहे. या विरोधी भूमिकांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपने गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वबळावर सत्ता मिळवली आहे. मात्र महाजन हे वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी भाजपला ‘खाविआ’च्या दावणीला बांधत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांमधून होत आहे.

मावळत्या पंचवार्षिकमध्ये जळगाव महापालिकेत सत्तेची खिचडी शिजवण्यासाठी भाजप वगळता सर्व पक्ष एकत्र आहेत. एकूण ७५ सदस्य असलेल्या महापालिकेत सर्वाधिक ३२ सदस्य ‘खाविआ’चे आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना, जनक्रांती आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. यामुळे महापालिकेवर माजीमंत्री सुरेश जैन यांच्या ‘खाविआ’चेच निर्विवाद वर्चस्व मानले जाते. मात्र राजकीय तडजोडींमुळे केवळ ११ सदस्य असलेल्या मनसेकडे महापौरपद आहे. ११ सदस्य असलेली राष्ट्रवादीदेखील सत्तेत भागीदार आहे तर १५ सदस्य असलेला भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे. मात्र यंदा निवडणुकीचे बिगूल वाजण्याआधीच भाजप आणि ‘खाविआ’ युतीची चर्चा सुरू झाली. युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आणि या चर्चेदरम्यान गिरीश महाजन देखील उपस्थित होते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री सुरेश जैन यांनी एका जाहीर सभेत केल्यानंतर जळगाव भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली. या विषयावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या ‘खाविआ’ आणि सुरेश जैन यांच्या विरोधात आतापर्यंत भाजप कार्यकर्ते लढले, त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील झाले, त्यांनी एकत्र कसे लढायचे, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. यात ‘खाविआ’ने सावध भूमिका घेत भाजप आणि राष्ट्रवादी दोघांशी जवळीक सुरू ठेवली आहे. निवडणुकीनंतर खान्देश विकास आघाडी, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि जनक्रांती एकत्र येण्याची शक्यता आहे. महाआघाडी विरोधात भाजपकडून महानगर विकास आघाडीचे नरेंद्र पाटील सोबत येतील असे दिसून येत आहे. महाआघाडी झाल्यास त्याचे नेतृत्व सुरेश जैन यांच्याकडे राहील. मात्र भाजपचे नेतृत्व कोण करेल, अशी चिंता कार्यकर्त्यांना सतावत आहे.

गेल्या पंचवार्षिकला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नेतृत्व केल्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले. मात्र आता पक्षाने त्यांना बाजूला सारले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील हे दोन-तीन महिन्यातून एकदा जळगावला हजेरी लावतात. मॅरेथॉन बैठका घेऊन निघून जातात. भाजपचे तिसरे मोठे नेते गिरीश महाजन यांची सुरेश जैन, मनसे ललित कोल्हे आणि शहर विकास आघाडीचे कैलास सोनवणे यांच्याशी जवळीक भाजपला अडचणीची मानली जाते.

शहराचा विकास व्हावा म्हणून आमचे नेते सुरेश जैन यांनी युतीची भूमिका मांडली. मात्र याचा अर्थ असा नाही की ‘खाविआ’ स्वबळावर लढू शकत नाही. आपापसातील वाद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी सर्वानी एकत्र यावे, यासाठी आम्ही सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.

नितिन लढ्ढा, गटनेते, खान्देश विकास आघाडी

गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही ५०हून अधिक जागा मिळविण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केलेली आहे. महापालिकेत आतापर्यंत ‘खाविआ’शी भाजपने युती केलेली नाही. गेल्या पंचवार्षिकला भाजपा सत्तेत नसताना चांगले यश मिळाले होते. आता परिस्थिती चांगली आहे. यामुळे स्वबळाचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल.

आमदार सुरेश भोळे, जळगाव शहर, भाजप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 3:56 am

Web Title: girish mahajan bjp jalgaon municipal corporation
Next Stories
1 कुक्कुटपालन संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्य़ात महिलांना रोजगार
2 रायगडाच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र
3 शिवसेना भीवसेना झाली आहे, मंत्रिपदासाठी लाळ गाळण्याचे काम सुरू: धनंजय मुंडे
Just Now!
X