12 November 2019

News Flash

पायल तडवींवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव नाही – गिरीश महाजन

रॅगिंग विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे.

संग्रहित

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही पहायला मिळाले. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणाबाबात कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी विधानसभेत मांडण्यात आली होती. यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय रूग्णालयात (नायर) स्त्रीरोग तज्ञ व प्रसुतीशास्त्र या पदव्युत्तर शिक्षणाचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रकरणातील दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. याचबरोबर प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंग विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्या अहवालानुसार महिनाभरात प्रभावशाली अंमलबजावणीसाठी शिफारशी करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

डॉ. तडवी यांनी रॅगिंग संदर्भात जी तक्रार केली होती. ती मागे घेण्यासाठी रूग्णालय अथवा महाविद्यालयातून कोणताही दबाव आणण्यात आला नव्हता. तसेच त्यांच्या शरीरावरील जखमा या शवविच्छेदनानंतरच्या असल्याचे निष्पण्ण झाले आहे. डॉ. पायल तडवी यांना आदिवासी असल्या कारणावरून मानसिक त्रास आणि अपमानजनक वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा अहुजा व डॉ. अंकिता खंडेवाल यांना अटक करण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत वाढ करून भायखळा कारागृहात चौकशीसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच, युनीट प्रमुखाला निलंबित करण्यात आले असून, विभागप्रमुखाची बदली करण्यात आली असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

नायर रूग्णालयातच नाही तर, राज्यातील सर्वच महाविद्यालयात रॅगींग विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी डॉ. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भातील अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

First Published on June 18, 2019 4:55 pm

Web Title: girish mahajan clarification dr payal tadavi suicide anti ragging law committee jud 87