मुख्यमंत्री घरात बसून आहेत. त्यांना राज्यातील प्रश्नांशी काही घेणे-देणे नाही. माझे कुटुंब-माझी जबाबदारी  हे फक्त उद्धव ठाकरे यांच्या घरापुरते मर्यादित आहे. राज्यात हाहाकार माजला. करोना आला. पूर आला. परंतु, मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले नाहीत, अशी टीका माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ  सोमवारी भाजपतर्फे किसान मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आकाशवाणी चौकात बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक विस्कळीत झाली. महाजन यांनी राज्य सरकारवर सडकू न टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांनी हमीभावाने शेतकऱ्याला दर दिला. विविध पिके घेतली. शेतकऱ्याला न्याय दिला. ते ३६ जिल्हे फिरत आहेत. तुम्ही का नाही फिरू शकत, असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना मारण्याचे काम हे सरकार करीत आहे.  विद्यार्थ्यांंचे विद्यालयात प्रवेश होत नाही. नोकऱ्या मिळत नाही. मागच्या वर्षी केरळला पाऊस झाला. तेथे आम्ही औषधे आणि डॉक्टर घेऊन गेलो. कोल्हापूर,  सांगली,  सातारा येथे पूर आला. त्या ठिकाणी पाण्यात उतरून वैद्यकीय सेवा पुरविली.  लोकांचे मदत कार्य केले आणि मुख्यमंत्री गुडघाभर पाण्यात उतरायला तयार नाहीत, अशी टीका महाजन यांनी केली.रक्षा खडसे, उन्मेष पाटील या दोन्ही खासदारांनीही ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आ. सुरेश भोळे , आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदुलाल पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महापौर भारती सोनवणे आदी उपस्थित होते.