विशेष प्रतिनिधी, मुंबई

उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला. एकनाथ खडसे यांना पक्षाने मुक्तवाव दिला होता. पण खडसे यांचे पक्षात बिनसले आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली. नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये महाजन यांनी पक्षाला यश मिळवून दिल्याने खडसे यांना पर्याय म्हणून उत्तर महाराष्ट्रात महाजन यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले आहे.

जळगाव जिल्हा म्हणजे  भाजप आणि खडसे असे समीकरण तयार झाले. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढत खडसे यांनी भाजपला यश मिळवून दिले. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ १९९१ पासून फक्त १९९८चा अपवाद वगळता भाजपने जिंकल्या आहेत. जिल्ह्यात भाजपने चांगली पकड निर्माण केली. खडसे आणि गिरीश महाजन या जोडीने जिल्ह्यात चांगलीच मुसंडी मारली. राज्यात सत्ता येताच भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. या वादातच खडसे यांचा राजकीय बळी गेला. पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी जून २०१६ मध्ये खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. राजीनाम्या आधीच खडसे आणि महाजन यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

खडसे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना पूर्ण ताकद दिली. खडसे यांची अनुपस्थिती जाणवणार नाही, अशा पद्धतीने राजकीय खेळी करण्यात आली. विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत फडणवीस-महाजन जोडगोळीने खडसे यांना पहिला दणका दिला.

खडसे यांचे निकटवर्तीय जगवानी यांचा पत्ता कापण्यात आला. महाजन यांनी शिफारस केलेल्या चंदू पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. हा खडसे यांना पहिला धक्का होता. तेव्हापासून जिल्हाच्या राजकारणात महाजन अधिक ताकदवान झाले.  यानंतर महाजन यांनी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर आपली  पकड निर्माण केली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीतही गिरीश महाजन यांनी भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. नाशिक, जळगावपाठोपाठ धुळ्यात महाजन यांची जादू चालली आहे.

जळगाव महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी महाजन यांच्यावर सोपविण्यात आली होती. महाजन यांनी भाजपला एकहाती यश मिळवून दिले. धुळे महानगरपालिका निवडणुकीतही मुख्यमंत्र्यांनी सारा विश्वास महाजन यांच्यावर टाकला. धुळ्याचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून महाजन यांना मुक्तवाव देण्यात आला. धुळ्यात ५० जागा भाजपला मिळाल्या. गोटे यांचा पार धुव्वा उडेल, असा अंदाज महाजन यांनी विधानसभा अधिवेशनाच्या काळात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला होता. महाजन यांचा अंदाज बरोबर ठरला. गोटे यांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली. आगामी विधानसभा निवडणुकीत गोटे यांना भाजपची उमेदवारीही मिळणे कठीण आहे.

महाजन यांच्यामुळे भाजपला खान्देशात खडसे यांना पर्याय मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू याबरोबरच पक्षाला प्रत्येक निवडणुकीत यश मिळवून देत असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या भाजपच्या राजकारणात खडसे यांचे नेतृत्व अस्ताला जाऊन महाजनशाहीच सुरू झाल्याचे मानले जाते.