उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. राज्य शासनाचा त्यात कोणताही हस्तक्षेप नसून आज भुजबळांची चौकशी होत असली तरी उद्या हा विभाग अजित पवार व सुनील तटकरे यांचीही चौकशी करू शकतो, असे सूचक विधान राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.
त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या अनघा फडके यांच्यासह मनसेचे सहा आणि दोन अपक्ष नगरसेवक अशा आठ जणांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. येथील भाजपच्या कार्यालयात महाजन यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, ही नगरपालिका ताब्यात घेत भाजपने मनसेला हादरा दिला आहे. यावेळी महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीचे नेते भुजबळ निर्दोष असल्याचे सांगत आहेत. जसे पेरले, तसेच उगवणार असा टोला लगावत महाजन यांनी कोणाला लक्ष्य करण्याची शासनाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. कोणी काही अनियमितता केली नसल्यास भीती बाळगण्याचे कारण नाही. त्यांनी चौकशीला सामोरे जावे, पुरावे सादर करावे आणि सुटका करून घ्यावी. पण, कोणी चुकीचे काम केले असल्यास कितीही मोठा व्यक्ती असला तरी तो चौकशीतून सुटणार नाही. सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पारदर्शकपणे काम करत आहे. त्यांनी मागणी केलेली सर्व कागदपत्रे जलसंपदा विभागाने दिली आहेत. कोणी कोणत्याही पक्षाचे असले तरी चुकीचे काम केले असल्यास सुटणार नाही. सर्वाची चौकशी होईल असे महाजन यांनी नमूद केले.