लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा यासाठी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसरेल्या अण्णा हजारेंची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत. अण्णांसोबत त्यांची चर्चा अद्याप सुरु आहे. अण्णांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.

दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना महाजन म्हणाले, सर्वांना अण्णांच्या प्रकृतीची काळजी आहे. अण्णांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांची पुर्तता होईल अशा गोष्टी नुकत्याच झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये मांडण्यात आल्या होत्या. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या आणि मजूरांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय झाले आहेत. अण्णांचे जे महत्वाचे प्रश्न मान्य करण्यात आले आहेत. लोकपालचा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टात आहे. राज्यातही लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठीची समिती जाहीर झाली आहे, त्यांची नावेही जाहीर झाली आहेत.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी निवड समितीला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लोकायुक्त निवडीची प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे अण्णांना मी विनंती करतो की त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे महाजन म्हणाले.

शिवसेनेनीही सरकारने अण्णांच्या जीवाशी खेळू नये असे म्हटले होते, यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, सध्या निवडणुकासमोर आहेत त्यामुळे अण्णांच्या या उपोषणाचा सर्वजण फायदा घेत आहेत. या विषयाकडे निवडणुकीच्या पलिकडे जाऊन बघितलं पाहिजे.