विकासाचे ढोल बडवणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा विळखा किती घट्ट आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण भानामतीच्या नावाखाली १७ वर्षांच्या मुलीला शेण खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. लातूरमधल्या धनगरवाडी गावात एक महिला आणि एका १७ वर्षांच्या मुलीवर करणी आणि भानामती झाल्याचा दावा एका भोंदूबाबाने केला. तसेच ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांची नावे जाहीर करण्यासाठी या मुलीला भोंदूबाबाकडे नेण्यात आले. तिथे या मुलीचे हात, पाय आणि केस धरून तिच्याकडून दोन महिला आणि एका पुरूषाचे नाव वदवून घेण्यात आले. त्यानंतर शेण खाल्ल्याशिवाय तुझी भानामती उतरणार नाही, असे सांगत तिला शेणही खाऊ घालण्यात आले. इतकेच नाही तर या सगळ्या प्रकाराचे चित्रीकरण करून ती व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पसरवण्यात आली आहे. याप्रकरणी प्रभाकर केसाळे, पंडित कोरे, गंगाधर शेवाळे, दगडू शेवाळे आणि कलुबाई कोरे या सगळ्यांविरोधात महराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या ग्रामस्थांची नावे पीडित मुलीकडून वदवून घेण्यात आली ते आता या मुलीवर चांगलेच संतापले आहेत. तसेच नातेवाईकांकडूनही प्रकरण चिघळवले जाते आहे. अशात या मुलीच्या जिवाला भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र अंनिसेचे राज्य प्रधान सचिव माधव बागवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांची भेट घेतली आहे. त्यांना सोशल मीडियावर पसरवण्यात आलेली पीडितेची क्लिपही दाखवली आहे. ज्यानंतर याप्रकरणात दोषी असलेल्या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl forced to eat buffalo dung to ward off evil spirits
First published on: 13-06-2017 at 18:59 IST