काही जण सर्व काही अनुकूल असतानाही उगाच तक्रारींचा पाढा वाचतात. मात्र काही जण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी तिचा कोणताही बागुलबुवा न करता सर्व अडचणींवर मात करतात. उस्मानाबादमधील कळंब येथील नेहा चौरेनं परिस्थितीबद्दल कोणतीही तक्रार न करता दहावीत तब्बल ९५.४५% टक्के घवघवीत यश मिळवलं आहे. लेकीनं मिळवलेल्या नेत्रदीपक यशाने वडिल सुरेश चौरे आणि आई राधाबाई चौरे यांना आकाश ठेंगणं झालं आहे.

कळंब तालुक्यातील हसेगाव हे नेहाचं गाव. तालुक्याच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात नेहा शिक्षण घ्यायची. घरची परस्थिती प्रतिकूल होती. मात्र परिस्थितीवर मात करत नेहानं दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. डॉक्टर होण्याचं स्वप्न नेहानं उराशी बाळगलं आहे. नेहाचे वडिल अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दीड एकर कोरडवाहू शेती आहे. त्यामुळे नेहाचे वडिल वजन काट्यावर काम करायचे. मात्र पोटाचा आजार झाल्यानं नेहाच्या वडिलांना ते काम सोडावं लागलं. त्यामुळे नेहाची आई राधाबाई यांनी शिवणकाम करून घरखर्च भागवला. आईला घरकामात मदत करत नेहा अभ्यास करायची. घरची परिस्थिती हलाखीची होती. मात्र लेकीने शिकावं, असं नेहाच्या घरच्यांना वाटायचं. आई-वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने नेहानं पहिलं पाऊल टाकलं आहे आणि दहावीत देदीप्यमान यश मिळवलं आहे.

गणितासारख्या अवघड विषयात नेहाने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तर विज्ञानात १०० पैकी ९९ गुण मिळवले आहेत. फक्त दहावीत चांगले गुण मिळवल्याने काहीही होणार नाही, याची नेहाला कल्पना आहे. त्यामुळे पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आहे. मुलीचं स्वप्न मोठं आहे. मात्र वडिलांची परिस्थिती आडवी येत आहे. मात्र सुरेश चौरे परिस्थितीसमोर हार मानणारे नाहीत. नेहा बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर पुढे काहीतरी मार्ग निघेल, अशी आशा सुरेश चौरे यांना आहे. पर्याय निघाला नाहीच, तर जमीन विकण्याचीही त्यांची तयारी आहे. ‘लेकरं शिकली, तर सगळं सार्थक होईल,’ या एकाच वाक्यातून सुरेश चौरे यांनी मुलांना खूप शिकवण्याचा त्यांचा निर्धार व्यक्त केला आहे.