यवतमाळ

शहरातील आंबेडकर नगर (पाटीपुरा) परिसरातील एका तरूणीचा तिच्या आतेबहिणीने फेसबुक मित्रांच्या मदतीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पीडितेला याची कुणकुण लागताच तिने आपल्या मावशीला कल्पना दिली. मावशीने यवतमाळ शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करताच पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अकोला येथून पंढरपूरच्या दोन युवकांसह पीडितेच्या आतेबहिणीला ताब्यात घेतले. अश्विनी पवन उभाडे (२६), रा. एमआयडीसी, अमरावती, प्रवीण बाजीराव गायकवाड (२६) व प्रकाश राजेंद्र गुजरे (२४) दोघेही रा. बाळवणी ता. पंढरपूर जि. सोलापूर अशी आरोपींची नावे आहेत.

यवतमाळातील आंबेडकर नगरातील एक तरूणी अमरावती येथे आपल्या आत्याकडे गेली होती. तेथून आतेबहीण अश्वीनीकडे गेली. अश्विनी हिची एक वर्षांपूर्वी प्रवीण गायकवाड याच्याशी फेसबुकवर मैत्री झाली होती. तो आपल्या एका मित्रासह अश्वीनीला भेटण्यासाठी अमरावतीकडे निघाला. वाटेत अकोला येथे थांबून त्याने प्रकाशला अश्विनीस घेण्यासाठी अमरावतीला पाठविले. प्रकाश अमरावतीत येताच अश्वीनीने यवतमाळहून आलेल्या मामेबहिणीस बडनेरा येथून प्रकाशच्या दुचाकीवर बसवून अकोला येथे आणले.

दरम्यान, आतेबहिणीच्या हालचालींचा संशय आल्याने पीडितेने संधी साधून आपल्या मावशीला आपबिती सांगितली. मावशीने तत्काळ यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात बहिणीच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी २३ ऑगस्टला या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पीडित तरूणीसह आरोपी अकोला बसस्थानकावर असल्याची माहिती यवतमाळ पोलिसांना मिळाली. त्यानंतर अकोला पोलिसांच्या मदतीने यवतमाळ पोलिसांनी बसस्थानकाहून रविवारी सायंकाळी चौघांनाही ताब्यात घेतले. आज सोमवारी चौघांनाही यवतमाळ येथे आणण्यात आले. गुन्हा अमरावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून घडल्याने यवतमाळ शहर पोलिसांनी दाखल गुन्हा अमरावतीच्या राजापेठ पोलिसांकडे वर्ग केला.