‘तू मुझे अच्छी लगती है’ असं म्हणत एका रिक्षावाल्याने तरूणीची छेड काढली आहे. ज्यानंतर या तरूणीने रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र रिक्षा वाल्याने रिक्षा न थांबवल्याने या तरूणीने रिक्षातून उडी मारली. नाशिकमधील इंदिरा नगर भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इंदिरानगर भागात असलेल्या महाराष्ट्र बँकेसमोर बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. उडी मारल्याने ही तरूणी जखमी झाली आहे. तिच्या चेहऱ्याला आणि उजव्या हाताला दुखापत झाली आहे.

नाशिकच्या इंदिरानगर भागातल्या महाराष्ट्र बँकेसमोर बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास एक तरूणी रिक्षात बसली. त्यावेळी रिक्षाचालकाने तिचा हात पकडला आणि तू मुझे अच्छी लगती है असं म्हणत तिची छेड काढली. ज्यानंतर या तरूणीने रिक्षा थांबवण्यास सांगितलं मात्र रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली नाही. ज्यानंतर तरूणीने आरडाओरडा केला. तसेच रिक्षावाला रिक्षा थांबवत नसल्याने तिने धावत्या रिक्षेतून उडी मारली.

या सगळ्या झटापटीत तरूणीच्या हाताला आणि चेहऱ्याला दुखापत झाली. या सगळ्या प्रकारानंतर तरूणीने तिच्या आईसह पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या तक्रारीनंतर अंबड गावात राहणाऱ्या रवी गोफणे या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

नाशिकमध्ये रिक्षावाले अवाच्या सवा भाडे आकारतात. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात कायमच वादावादीचे प्रकार घडतात. अनेकदा तक्रारी करूनही रिक्षाचालकांची मुजोरी थांबताना दिसत नाही. अशात आता तरूणीची छेडछाड करेपर्यंत रिक्षावाल्यांची मजल गेल्याचे या घटनेवरून दिसते आहे. अशा रिक्षावाल्यांवर कठोरातली कठोर कारवाई केली जावी अशी मागणी नाशिककर करत आहेत.