News Flash

बारामतीत आंतरजातीय विवाहाच्या वादातून मुलीचा खून ; आई अटकेत

ॠतुजा हरिदास बोबाटे (वय १९,रा. प्रगतीनगर, बारामती) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे : आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीचा आईने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना बारामती शहरात मंगळवारी सकाळी घडली. मुलीबरोबर झालेल्या वादातून खून केल्यानंतर आई स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने मुलीचा खून केल्याची कबुली दिली.

ॠतुजा हरिदास बोबाटे (वय १९,रा. प्रगतीनगर, बारामती) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. या प्रकरणी तिची आई संजीवनी (वय ३५) हिला बारामती शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॠतुजा बारामती शहरातील एका महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिक्षण घेत होती. तिचे बारामती शहरातील एका युवकाबरोबर प्रेमसंबंध होते. ॠतुजाने आई-वडिलांचा विरोध डावलून युवकाबरोबर विवाह केला.

या घटनेनंतर संबंधित युवकाने तिला माहेरी पाठविले आणि तिला नांदवण्यास नकार दिला. त्यामुळे ॠतुजा आणि तिची आई संजीवनी यांच्यात भांडणे सुरू झाली होती.

‘मला सासरी नांदायला जायचे आहे,’असा तगादा तिने लावला होता. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर संजीवनीने तिच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर संजीवनी स्वत:हून बारामती पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने मुलीचा खून केल्याची कबुली दिली.

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी शिरगावकर, बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी घटनास्थळी भेट दिली. ॠतुजाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

ॠतुजाच्या मागे आई-वडील आणि दोन लहान भाऊ असा परिवार आहे. तिचे वडील एका बँकेत शिपाई आहेत. सहाय्यक निरीक्षक बडवे तपास करत आहेत.

आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्येच्या घटना

*   नगर जिल्ह्य़ातील नेवासा तालुक्यात आंतरजातीय विवाहातून युवतीला जाळले

*   इंदापूर येथे आंतरधर्मीय विवाहातून युवकाला पेटवले; युवक जखमी

*  पुण्यातील चांदणी चौकात आंतरजातीय विवाहातून तरुणावर गोळीबार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 3:37 am

Web Title: girl murdered in baramati over inter caste marriage dispute
Next Stories
1 ९५ हजार दुबार मतदार?
2 वनविभागाकडून आदिवासींची अडवणूक
3 अपहरण झालेल्या व्यवस्थापकाचा खून
Just Now!
X