प्रेमप्रकरण लपवण्यासाठी विरार स्थानकात सोनसाखळी चोरी झाल्याची खोटी तक्रार

वसई : घरच्यांशी खोटं बोलून प्रियकराला चोरून भेटायला जाणे एका तरुणीच्या चांगलेच अंगलट आले. मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून विरार मधील एक तरुणी प्रियकरासोबत वसईच्या सुरूची बाग समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. तिथे दोन गुंडांनी या जोडप्याला धमकावून तरुणीची सोनसाखळी काढून गेली. लुटीचा हा प्रकार घरी सांगितला तर प्रेमकरण उघडकीस येईल म्हणून तिने विरारमध्ये चोरी झाल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांच्या अचूक तपासाने जोडप्याला लुटणारे गजाआड झाले मात्र तरुणीच्या प्रेमप्रकरणाचेही बिंग फुटले.

विरारमध्ये राहणारी २० वर्षीय तरुणीने रचलेल्या बनावाने पोलिसांना चांगलाच घाम फोडला. सध्या टाळेबंदीमुळे महाविद्यालय बंद असल्याने तिला आपल्या प्रियकराला भेटता येत नव्हते. त्यामुळे मागील आठवडय़ात तिने मैत्रिणीला भेटायला नायगावला जात आहे, अशी थाप घरी मारली. त्यानंतर ती प्रियकराला घेऊन वसईच्या सुरूची बाग समुद्रकिनाऱ्यावर गेली. तेथे दोन गुंडांनी प्रियकराला मारहाण करून तिच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांची सोनसाखळी काढून पळ काढला. घरी हा प्रकार सांगितला तर प्रेमाचे बिंग फुटेल अशी भीती तिला वाटली. त्यामुळे तिने नवीन बनाव रचला. नायगाव  येथून मैत्रिणीच्या घरातून परतत असताना विरार स्थानकात उतरल्यावर एका इसमाने गळ्यातील सोनसाखळी चोरल्याचे तिने घरी सांगितले. तिच्या पालकांनी मुलीवर विश्वास ठेवून याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

विरार स्थानक परिसरात सोनसाखळी चोरीची घटना घडणे गंभीर होते. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. तक्रारदार तरुणी विरार स्थानकात ट्रेनमधून उतरत असताना तिचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. त्या वेळी या तरुणीच्या गळ्यात सोनसाखळी नसल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या तरुणीची चौकशी करताच तिने खरा प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा वसई पोलिसांकडे वर्ग केला.

सुरूची बागेत अनेक प्रेमी जोडपे जात असतात. पोलिसांनी घटनेच्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासले आणि त्यांना दोन संशयित तरुण दिसले. गुप्त माहितीदाराकडून अधिक माहिती काढून पोलिसांनी राहुल दुबे (१९) आणि सूरज भारती (२०) या दोघांना अटक केली. हे दोन्ही आरोपी नालासोपारा येथे राहात आहे. त्या दोघांनी चोरीची कबुली दिल्याचे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली.

सुरूची बाग जोडप्यांसाठी धोकादायक

सुरूची बाग समुद्रकिनाऱ्यावर अनेक तरुण जोडपी फिरण्यासाठी जात असतात. हा किनारा शहरापासून दूर आहे. एकांत आणि खासगीपणा मिळावा म्हणून अनेक जोडपी घनदाट झाडी असलेल्या निर्जन ठिकाणी जातात. त्यांना लुटण्याचे प्रकार वाढू लागले आहे. त्यामुळे जोडप्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.