सोलापूर : अहमदनगरातील तोफखाना परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे पडसाद सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या घटनेचा सर्व पक्षीय नगरसेवकांनी निषेध नोंदविला. या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई होण्याची मागणीही करण्यात येऊन सभा तहकूब करण्यात आली. उद्या बुधवारी सोलापुरात पद्मशाली समाजाच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मूकमोर्चात सर्वपक्षीय नगरसेवकांनी सहभागी होण्याचा निर्धारही या सभेत करण्यात आला.

सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरूवातीला लक्षवेधी प्रश्नांद्वारे शहरात पसरत चाललेल्या साथींच्या रोगांबाबत सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी अहमदनगरच्या तोफखाना परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सभा तहकुबीचा ठराव मांडला. या घटनेचे गांभीर्य सभागृहात उमटले. कोठे यांच्या प्रस्तावाला भाजपचे सभागृहनेते संजय कोळी यांच्यासह काँग्रेसचे अ‍ॅड. यू. एन. बेरिया, एमआयएमचे गटनेते तौफिक शेख,माकपच्या कामिनी आडम, भाजपचे नागेश वल्याळ, बसपाचे गणेश पुजारी, राष्ट्रवादीच्या सुनीता रोटे आदींनी जोरदार पाठिंबा दिला.

नगरची लैंगिक अत्याचाराची घटना गंभीर आहे. अशा घटना समाजात अधूनमधून घडत आहेत. गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटेनाशी झाली आहे. म्हणूनच अशा घटना वारंवार घडतात, याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधत या प्रश्नावर तीव्र भावना व्यक्त केल्या. या घटनेच्या निषेधार्थ सभा तहकूब करण्यात आल्याचे महापौर बनशेट्टी यांनी जाहीर केले. नगरच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी सोलापुरात पद्मशाली समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या मूकमोर्चात सर्वपक्षीय नगरसेवकांनी सहभागी होण्याचा निर्धारही बोलून दाखविला. उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता कन्ना चौकातून मूकमोर्चा निघणार आहे. हा मूकमोर्चा साखरपेठ, विजापूरवेस व पंचकट्टामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.