येथील एसटी महामंडळाच्या आगार प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.  सिंदखेडराजामधील बसस्थानक घाणीच्या साम्राज्यात बुडाले. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे परिसरातील नागरिक बसस्थानकावर दररोज घाण करतात, तर गेटसमोर अवैध प्रवासी वाहतूक व खाजगी गाडय़ा बसस्थानकावर खुलेआम उभ्या करतात. सिंदखेडराजा ते भोसा मार्गावर ३५० पासधारक विद्यार्थिनी असूनही मानव विकासची एकही बस गाडी नाही. त्यामुळे विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बसगाडी नसल्यामुळे शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झाला आहे, तर सिंदखेडराजा ते गारखेड मार्गावर १८५ पासधारक विद्यार्थिनींचे बसअभावी हाल होत आहेत. सिंदखेडराजा बसस्थानाकावरून दररोज लांब पल्ल्याच्या नागपूर, मुंबई, गडचिरोली, पुणे, सातारा, ठाणे, पंढरपूर अशा २३० बसगाडय़ा १२ तासात जाणे-येणे करतात, तर मेहकर आगाराच्या फक्त ५ बसगाडय़ांच्या दिवसभर फेऱ्या राहतात. सिंदखेडराजावरून माळसावरगाव, नशिराबाद, अंचली, दरेगाव, वसंतनगर, डावरगाव, धांदरवाडी, दत्तापूर, शेलू भोसा या गावांमधील ३५० विद्यार्थिनी व विद्यार्थी पासधारक असून मानव विकास यंत्रणेची एकही बसगाडी नाही. इतर बसगाडय़ा असल्या तरी शाळेच्या वेळेवर विद्यार्थिनी गर्दीमुळे शाळेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. सिंदखेडराजा ते गारखेड मार्गावर सावखेड तेजन, हनवतखेड, माहेखेड, सुजलगाव, वडाळी, वाघुरा, खामगाव खारखुट्टी ही गावे असून अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या १८५ असून मानव विकासाची एकच बसगाडी आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे, असे वाहतूक नियंत्रक वाय.एस. खान यांनी
सांगितले.