हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात लग्नास नकार दिल्याने चार जणांनी मुलीच्या वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. कैलास शिंदे असे हत्या झालेल्या पित्याचे नाव असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेले भुजंग शिंदेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. शिंदे यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सेनगाव तालुक्यातील दाताळा बु. येथे राहणाऱ्या कैलाश शिंदे यांना एक मुलगी आहे. ही मुलगी सचिन नारायण सूरनर याने लग्नासाठी पसंत केली होती. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी सचिनचे स्थळ नाकारले होते. कैलास यांनी सचिनला नकारही कळवला होता. यामुळे सचिन संतापला होता. हाच राग मनात धरून सचिन नारायण सुरनर, किरण नारायण सुरनर, नितीन विश्वनाथ कवडे, गणेश नामदेव कवडे यांनी ९ नोव्हेंबरच्या रात्री साडेसातच्या सुमारास कैलास शिंदे एका मंदिराजवळ बसलेले असताना त्यांच्यावर गुप्ती, व धारदार शस्त्राने वार केले. हा प्रकार पाहून कैलाश शिंदे यांचे चुलत बंधू भुजंग धोंडबा शिंदे वाद सोडवण्यासाठीमध्ये पडले असता सचिन व त्याच्या साथीदारांनी भुजंग यांच्यावरही वार केले. या हल्ल्यात भुजंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 4:11 pm