देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : शिक्षणात मुलींच्या गुणवत्तेची टक्केवारी वाढत असली तरी शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या मुलींची टक्केवारी कमी होत असल्याचे वास्तव निकालाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालात राज्यात मुलींनी बाजी मारली; पण बारावी परीक्षेला राज्यातून मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या ८८ हजार ४२० एवढी कमी आहे, तर दहावीमध्ये ७७ हजार ५१० मुली मुलांच्या तुलनेने कमी आहेत. ही घट दरवर्षी होत असल्याचे मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते. सन २०१८ मध्ये बारावीत १ लाख ८३ हजार विद्यार्थिनी मुलांच्या तुलनेत कमी आहेत.

मुलींच्या विकासाकडे शासन विशेष लक्ष देते. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिष्यवृत्तीसह विविध योजनाही शासन राबवते. या सर्वाचा परिपाक म्हणून केंद्रीय आणि राज्य शिक्षण मंडळाच्या निकालांत मुलींचा वरचष्मा असतो. मात्र, या निकालाच्या मागचे वास्तव आत्मचिंतनाला भाग पाडणारे आहे.

मुलींची निकालातील टक्केवारी ही मुलांपेक्षा अधिक असली तरी प्रवेशित मुलींची संख्या (शाळेत प्रवेश घेणाऱ्या) मुलांच्या तुलनेत फार कमी आहे. २०२० मध्ये राज्यातून १२ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये मुलांची संख्या ६ लाख ५० हजार, तर मुलींची संख्या केवळ ५ लाख ९६ हजार होती. मुलींची संख्या मुलांपेक्षा ८८ हजारांनी कमी होती. निकालात मुलींनी बाजी मारली असली तरी मुलांच्या तुलनेत शिक्षण घेणाऱ्या मुली कमीच आहेत. त्यामुळे मुलींच्या शैक्षणिक विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वर्ष     इयत्ता       मुले            मुली               घट

२०१८   दहावी   ६,६८,१२५       ५,८४,६९२       ८३,४३३

बारावी   ८,३४,२३४       ६,५०,८९८       १,८३,३३६

२०१९   दहावी   ६,२८,६४४        ६,१९,२५९       ९,३८५

बारावी  ६,५२,३७९           ५,६८,७८०       ८३,५९९

२०२०   दहावी   ७,८९,३०९        ७,११,७९६         ७७,५१३

बारावी  ६,८५,००६            ५,९६,६४६           ८८,३६०