दहावीत ९६.२० टक्के गुण मिळवणाऱ्या पायलचा संकल्प

संपूर्ण दारूबंदी असतानाही चंद्रपूर शहरात अवैध दारूविक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. या अवैध दारूच्या व्यवसायात माझे वडील सक्रिय आहेत. या व्यसनामुळे त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले. आता मला भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होऊन हे वाईट दिवस दाखवणाऱ्या अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करायचे आहे, असा संकल्प  दहावीत ९६.२० टक्केगुण मिळवणाऱ्या पायल प्रकाश बानकर या विद्यार्थिनीने व्यक्त केला.

दहावीचा निकाल नुकताच घोषित झाला व लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या पायलने ९६.२० टक्के गुण प्राप्त करून परिस्थितीवर मात करत स्वत:ला सिद्ध केले. पायल ही अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी. वडील असूनही नसल्यासारखे, दारूच्या व्यसनाधीनतेने कुटुंबाचे हाल सुरू झाले.

मात्र, आईने हार मानली नाही. जिद्दीने ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. हीच जिद्द पायलच्या स्वभावात आहे. याच बळावर तिने दहावीत हे यश संपादन केले. दहावीच्या निकालानंतर शाळा व्यवस्थापनाकडून तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळय़ात तिने आयएएस होण्याची इच्छा व्यक्त केली. आयएएस होण्यामागील नेमका विचार मांडताना तिने दारूबंदीचे दाहक वास्तव सांगितले. शिकवणी वर्गापेक्षा शाळेतील शिक्षक अतिशय चांगले शिकवतात. त्यामुळे शिकवणी वर्गापेक्षा विद्यार्थ्यांनी शाळेला महत्त्व द्यायला हवे, याकडेही तिने लक्ष वेधले.  शिक्षक, आई, ताईच्या मार्गदर्शनामुळेच आपणाला हे यश मिळवता आले, या शब्दात पायलने या सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.