‘गिर्ये-बे-विजयदुर्ग आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बंदर’ व्हावे म्हणून भारत सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी विजयदुर्ग येथील अविनाश गोखले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालावे, अशी त्यांची मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील विजयदुर्गपासून ४ ते ५ किमी अंतरावर पश्चिमेकडे ‘कालवशी’ नावाचा परिसर प्रसिद्ध आहे. त्याच दरम्यान भौगोलिक परिस्थिती पोषक असणारे बंदर साकारू शकते. अगदी किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर १०-२० मीटर ते २८-३० मीटर पाणी खोल असणारे बंदर येथे उभारले जाऊ शकते, असे अविनाश गोखले म्हणाले. यासाठी गेली दहा वर्षे आपण शासन स्तरावर पाठपुरावा करत आहे, असे अविनाश गोखले यांनी बोलताना सांगितले. शासनकर्ते बदलले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे जलवाहतूक व बंदरे विकास धोरणामुळे जनता प्रफुल्लित झाली आहे. त्यातच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वैभववाडी ते विजयदुर्ग बंदरापर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जलवाहतूक, रेल्वे विकास व बंदर विकासाची स्वप्ने साकारण्याची आशा निर्माण झाल्याचे अविनाश गोखले म्हणाले.
येत्या १४ ते १६ एप्रिलदरम्यान मुंबईत मेरी टाइम सेमीनार आयोजित केले असून, केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. हजारो कोटीचे उद्योग, प्रकल्प व रोजगार निर्मितीची त्यामागची संकल्पना आहे. या उपक्रमास भागीदार देश म्हणून दक्षिण कोरिया सहभागी होईल, तसेच ५७ देशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बंदराचे सादरीकरण मेरी टाइम करणार आहे, असे गोखले म्हणाले. गिर्ये-बे-विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बंदर असल्याने मेरी टाइम बोर्ड सादरीकरणात प्राधान्य देईल, अशी अपेक्षा अविनाश गोखले यांनी व्यक्त केली. या बंदराचा मेरी टाइमचे कॅप्टन दिवाकर, पोर्ट ऑफिसर प्रसाद यांना चांगला अभ्यास आहे. ते निश्चितच विजयदुर्ग बंदराचे महत्त्व सांगतील, असे अविनाश गोखले म्हणाले. या बंदराजवळ कांदळवन, लोकवस्ती, शेती, फळ झाडे नाहीत, त्यामुळे येथे मोकळी जागा आहे. खासगीकरणातून जमिनी उपलब्ध होऊ शकतात. येथून कोल्हापूर जवळ असून रेल्वेमार्गदेखील होणार आहे. त्यामुळे बंदराची घोषणा व्हावी अशी अपेक्षा गोखले यांनी व्यक्त केली.