आरक्षणाचे जनक लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. यापूर्वी लोकसभेमध्ये महाडिक यांना असा प्रस्ताव सादर करत सर्वांचे लक्ष वेधले होते. याचाच पाठपुरावा आणि दिवाळीचे औचित्य साधून खासदार महाडीक यांनी सर्व खासदारांना शाहू महाराजांचं इंग्रजीतून उपलब्ध असणारा चरित्रात्मक ग्रंथ भेट स्वरुपात पाठवला.

यापूर्वीच शाहू महाराजांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवणं अपेक्षित होतं. पण, निदान आतातरी सरकारने त्या दृष्टीने पावलं उचलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचे समाजिक कार्यात मोठे योगदान आहे. आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक न्यायासाठी प्रयत्न केले. आपल्या करवीर संस्थानातून त्यांनी देशातील पहिले आरक्षण लागू केले होते. यापूर्वी अनेकांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे राजर्षी शाहूंचाही भारतरत्नने सन्मान करावा. ‘गेल्या अधिवेशनामध्ये मी लोकसभेत याविषयीची मागणी केली होती. कोल्हापूरातील स्थानिक, संस्थानिक यांनाही त्यासंबदर्भातील मागणी करणारी पत्रं पंतप्रधानाना पाठवण्याचं आव्हान केलं होतं’, असंही महाडीक यांनी सांगितलं.

राजर्षी शाहू महाराजांचं कर्तृत्व हे फक्त उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापुरताच मर्यादीत न राहता ते संपूर्ण देशभरात पोहोचवणं हाच आपला मानस असल्याच महाडीक यांनी स्पष्ट केलं. तेव्हा आता त्यांच्या या मागणीला सरकार दरबारी दाद मिळणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.