सध्याच्या स्पध्रेच्या युगात पालकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असून मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन २४ व्या अखिल भारतीय बाल-कुमार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मदन हजेरी यांनी केले.
राजापूर तालुक्यातील ओणी येथे पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना हजेरी म्हणाले की, सध्याच्या विस्कटलेल्या सामाजिक जीवनात मुलांची मुस्कटदाबी होत आहे. स्पध्रेच्या युगात आपल्या मुलाने अव्वल यावे म्हणून पालक हव्यास धरतात. त्यामुळे मुलांच्या सर्जनशीलतेकडे दुर्लक्ष होते. पिझ्झा, बर्गर, वडापावसारख्या खाद्यपदार्थावर खर्च होतो, पण मुलांच्या हाती चांगली पुस्तके देण्यासाठी खर्च केला जात नाही. हे चित्र बदलण्याची गरज असून घरग्रंथालय ही कल्पना रुजण्याची आज आवश्यकता आहे.
आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत वाचनप्रसार, सुलेखन, बाल साहित्यिकांची कार्यशाळा इत्यादी उपक्रमांवर भर देणार असल्याचेही हजेरी यांनी जाहीर केले.
यंदाच्या वर्षांपासून बाल साहित्य आणि बाल साहित्यिकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मधुमंगेश कर्णिक यांनी या प्रसंगी बोलताना केली. यापूर्वी बाल साहित्याला फक्त एक ते दोन हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येत असे. ही रक्कम आता पंचवीस हजार रुपये करण्यात आली असून बाल साहित्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार एक लाख रुपये करण्यात आला असल्याचे त्यांनी जाहीर केले.
बाल साहित्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी, मावळते संमेलनाध्यक्ष गोविंद गोडबोले, स्वागताध्यक्ष वासुदेव तुळसणकर, गटविकास अधिकारी तानाजी नाईक इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरी येथील बालकाश्रमातील मुलांसह अन्य बाल चित्रकारांनी काढलेल्या विविध विषयांवरील चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत स्त्री-भ्रूणहत्या या विषयावरील पथनाटय़ाने प्रथम क्रमांक पटकावला.
दोन दिवस चाललेल्या या संमेलनात लहान मुले व ज्येष्ठ कवींचे कविसंमेलन, कथाकथन, परिसंवाद इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रदर्शनानिमित्त भरलेल्या ग्रंथ प्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.