खासगी सावकारी जाचामुळे त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ महाविकासआघाडी सरकारने द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. तसेच, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकारने कर्जमाफी जाहीर करुनही खासगी सावकरीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील म्हात्रे वाडीतील एका शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे अशा त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच, मागील सरकारने अशा प्रकारे खासगी सावकारीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला होता, याची आठवणही यावेळी त्यांनी करुन दिली.
त्याचप्रमाणे, औरंगाबाद महापालिकेचे माजी महापौर आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2020 6:08 pm