देशात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे, त्यामुळेच सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, भ्रष्ट राजकारणी व भ्रष्ट अधिकारी त्याचा गैरफायदा घेत आहेत, तरुणांनी वेळीच याविरुद्ध आवाज उठवावा असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्नेहालय संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केला.
संस्थेने आयोजित केलेल्या १४ व्या युवा प्रेरणा शिबिराच्या निमित्ताने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याचे अनावरण हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या नगरमध्ये केलेल्या घोषणेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी तरुणांना स्वातंत्र्य मूल्ये जोपासण्यासाठी,समाजातील भ्रष्ट जातीपाती व न्यायव्यवस्थेविरुद्ध आवाज उंचावून समभाव जोपासण्यासाठी संघटित लढा देण्याचे आवाहन केले. लोकमान्य टिळकांच्या नातसून मुक्ता टिळक यांनी टिळकांचे कार्य विशद केले. अर्शद शेख यांनी जातीपातीच्या आधारवर होणारे अन्यायकारक राजकारण बदलण्यासाठी युवकांचे सक्षमीकरण होण्याची आवश्यकता व्यक्त केली.
शिबिरात २५० जणांना सहभाग देण्यात आल्याची माहिती समन्वयक नितीन गवारे यांनी दिली. सूत्रसंचा लन संजय बांदिष्टी यांनी केले. संजय गुगळे यांनी आभार मानले. डॉ. स्मिता केतकर, डॉ. देवदत्त केतकर, सुवालाल शिंगवी आदी उपस्थित होते. अनिल गावडे, हनीफ शेख, प्रविण मुत्याल, विशाल अहिरे, मोबीन शेख, विकास सुतार आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.