संगमनेरसह राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. संकटकाळी शासन नेहमी शेतक-यांच्या पाठीशी उभे राहिले असून याहीवेळी गारपीटग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून जास्तीतजास्त मदत दिली जाईल असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
गारपिटीने अतोनात नुकसान झालेल्या मांडवे, बिरेवाडी, साकूर, चिंचेवाडी, चंदनापुरी, झोळे, सावरगाव तळ, निमज आदी गावांना भेटी देऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, दूध संघाचे अध्यक्ष आर. बी. राहाणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर आदी त्यांच्या समवेत होते.
थोरात म्हणाले की, अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती आहे. राज्यासह तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब, द्राक्षे आदी फळबागांसह भाजीपाला, कांदा पिकाचेही नुकसान झाले, काही ठिकाणी जनावरेही दगावली. शासन कायम शेतक-यांच्या पाठीशी उभे राहिले असून याही वेळी नुकसानग्रस्त शेतक-यांना अधिकाधिक मदत करण्याचा प्रयत्न राहील. तालुक्यात पंचनामे करण्यासाठी २७ गट कार्यरत करण्यात आले आहेत. प्रत्येक आपत्तीच्या वेळी आपण सामूहिकपणे मुकाबला केला आहे. याहीवेळी आपण संकटातून बाहेर पडू असा विश्वास त्यांनी शेतक-यांना दिला. वाकचौरे, तांबे यांचीही या वेळी भाषणे झाली.