राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून समृद्धी महामार्ग जाणार आहे. जर तसे झाले तर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या हीच त्यांना आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी मानवंदना ठरेल अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील पाचव्या दिवसाची सभा आज (रविवार) बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे झाली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. त्यानंतरच्या भाषणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही त्याचा पुनरूच्चार करतांना या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव न दिल्यास उद्या आम्ही सत्तेवर आल्यानंतर हे नाव देऊ अशा शब्दात मुंडे यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

आज महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. गावागावातील पाण्याच्या टँकरची मागणी सरकारकडून पुरवली जात नाही. दुष्काळसमयी शेतकऱ्यांना काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र एमआरइजीएस अंतर्गत कोणतेच काम नसल्याचा आरोप त्यांनी केला.

गेल्या साडेचार वर्षा़ंपासून हिवाळा असो वा पावसाळा या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी उन्हाच्या झळाच सहन करत आहे. ऐतिहासिक कर्जमाफी करताना वापरात आलेले सरसकट, तत्वत: इतके भारदस्त शब्द संघातूनच आले असावेत असा टोला लगावताना सरसकट कर्जमाफी केली असे सरकार म्हणतंय. पण बोटावर मोजता येईल इतक्या शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा झालेला नाही याकडे त्यांनी मुंडे यांनी लक्ष वेधले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष काझी, गफार मलिक आदी उपस्थित होते.