महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीची मागणी
चिपळूणला होऊ घातलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काढण्यात येणारी ग्रंथ दिंडी संमेलन संयोजकांनी रद्द करणे म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी, विवेकी आणि सहिष्णू संस्कृतीचा अवमान आहे. ही घटना अविवेकी, असहिष्णू व धर्मनिरपेक्षता विरोधी शक्तींना बळ देणारी व पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी म्हणून निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळे नियोजित कार्यक्रमानुसार आणि साहित्य संमेलनाची परंपरा व संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ती रद्द न करता तिचे स्वागत करा, असे आवाहन महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने केले आहे.
८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वी वेगवेगळ्या विषयांवर वाद सुरू झाले आहेत. हमीद हलवाई यांच्या घरापासून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार होती, मात्र ग्रंथ दिंडीमुळे नवा वाद निर्माण झाल्यामुळे संमेलन संयोजकांनी दिंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात साहित्य वर्तुळातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली.  महाराष्ष्ट्र सांस्कृतिक आघाडीने या संदर्भात नाराजी व्यक्त करीत ग्रंथ दिंडी रद्द करू नका, असे आवाहन केले.
ग्रंथ दिंडी हा साहित्य संमेलनाचा एक भाग आहे. त्यामुळे वातावरण निर्मिती होते. महात्मा फुले यांच्या प्रबोधन परंपरेतील थोर समाज सुधारक हमीद दलवाई यांच्या घरापासूनची काढण्यात ग्रंथ दिंडी रद्द करण्याच्या निर्णयाचा संमेलन संयोजकांनी अजूनही वेळ गेली नसल्याने विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या सल्लागार आणि मागदर्शक प्रा. पुष्पा भावे, कवयित्री प्रज्ञा पवार, कविता महाजन, श्रीधर तिळवे या लेखक कवी समीक्षकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व लेखकाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीचे नाव संमेलन व्यासपीठाला देण्याच्या आयोजकांच्या कृतीवर जो आक्षेप नोंदविला, आहे त्यास सांस्कृतिक आघाडीने पाठिंबा दिला आहे.  
संमेलन व्यासपीठाला ठाकरे कुटुंबीयातील नाव द्यायचे असेल तर कुणाचा आक्षेप नसलेले प्रबोधनाचे अग्रदूत असललेले प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देण्याचा विचार करण्यास अजूनही अवधी असल्याने तसा विचार संमेलन संयोजकांनी करावा, त्याचप्रमाणे विशिष्ट उपजातींची प्रतिके वापरण्यास असणाऱ्या विरोधाचा सन्मान करून ती प्रतिके मागे घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने केले आहे.