कर्णबधिरांना ब्रेल लिपीत जास्त प्रमाणात मराठी साहित्य उपलब्ध करून देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने करावी आणि त्यास योग्य ते पाठबळ द्यावे, अशी अजब मागणी करणारा ठराव अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केला आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चिपळूण येथे नुकत्याच झालेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात हा जगावेगळी मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. एवढेच नव्हे, तर टाळय़ांचा कडकडाट करून सर्वच ठराव संमतदेखील करण्यात आले. मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या साहित्य महामंडळाने हा ठराव करताना बुद्धी गहाण ठेवली की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अंध व्यक्तींकरिता असा शब्दप्रयोग केला जात नाही. अंध असे म्हणण्याऐवजी दृष्टिहीन व्यक्ती असा शब्द वापरला जातो. त्याचप्रमाणे कर्णबधिरांना बोलक्या पुस्तकांचा उपयोग होत नाही हे खरे असले तरी त्यांना वाचता येते ही बाब ठराव करणाऱ्या सूचक आणि अनुमोदक व्यक्तींच्या ध्यानातच आली नाही. त्यामुळेच ही मागणी हास्यास्पद ठरली आहे.
साहित्यातले पाणी..
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर पडून साहित्यिकांनी समाजाचे प्रश्न हे आपल्या साहित्यातून मांडावेत. साहित्य हे जीवनसन्मुख आणि समाजाभिमुख असावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याचाच परिपाक म्हणून मराठवाडय़ातील तीव्र झालेल्या पाणीप्रश्नी शासनाने लक्ष घालून मराठवाडय़ाला पिण्यासाठी पुरेसे पाणी त्वरित पुरवावे, अशी मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. प्रा. कौतिकराव ठाले-पाटील आणि डॉ. दादा गोरे हे या ठरावाचे सूचक आणि अनुमोदक मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी आहेत, हादेखील निव्वळ योगायोग यानिमित्ताने साधला गेला आहे.
.. आणि ‘अंध’ शब्दच राहून गेला
‘त्या’ ठरावात जी व्यक्ती ‘अंध’आणि कर्णबधीर अशी आहे, अशा व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके जास्त प्रमाणात असावी, असे आम्हाला अपेक्षित होते. पण ‘अंध’ हा शब्द लिहायचा राहून गेला, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
ठरावाचा मसुदा
अंध व्यक्तींकरिता ब्रेल लिपीत तसेच बोलक्या पुस्तकांच्या माध्यमातून अल्पप्रमाणात तरी मराठी साहित्य उपलब्ध आहे. परंतु, कर्णबधिरांना बोलक्या पुस्तकांचा उपयोग होत नाही. म्हणून ब्रेल लिपीत जास्त प्रमाणात मराठी साहित्य उपलब्ध करून देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने करावी आणि त्यास योग्य ते पाठबळ द्यावे, अशी मागणी हे ८६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.  सूचक – योगेश देसाई, अनुमोदक – डॉ. विद्या देवधर