धवल कुलकर्णी

लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला काम उरलेलं नाही. मालेगावची स्थिती काही वेगळी नाही. हाताला काम नाही आणि पोटात अन्न नाही अशा बिकट अवस्थेत इथले अनेकजण आहेत. काही गरीब लोकांना तर अक्षरशः भीक मागून जगावे लागत आहेत. सरकार रेशनवर स्वस्त दरांत धान्य देऊ अशा घोषणा करते मात्र दिलेला शब्द पाळत नाही. त्यामुळेच आम्हाला पोटाला अन्न मिळालं पाहिजे किंवा लॉकडाउन संपवा आणि कामं सुरु करु द्या अशी मागणी मालेगावमधले एमआआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केली.

लोकसत्ता डॉट कॉम शी बोलताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे आमदार असलेले मुफ्ती मोहम्मद इस्माईल म्हणाले की शहरामध्ये ४४ हजार कुटुंबांकडे पिवळी रेशन कार्डं आहेत आणि त्यांना रेशनचे धान्य मिळतं. त्याच बरोबर केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाची संख्या ही १ लाख २० हजारांच्या आसपास आहे. सरकारने अशी घोषणा केली की केशरी रेशन कार्ड असलेल्या लोकांना सुद्धा कमी किमतीत धान्य मिळेल. मात्र  या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. मालेगाव हे यंत्रमाग आचे शहर आहे आणि वस्त्रोद्योग सोडला तर लोकांकडे उत्पन्नाचे अन्य कुठलेही साधन नाही.

नाशिक जिल्ह्यातील मुस्लिम बहुल मालेगाव शहरांमध्ये आतापर्यंत दीडशे च्या आसपास करोना चे रुग्ण आढळून आले आहेत आणि या रोगामुळे झालेल्या मृत्यूची संख्या साधारणपणे २० च्या दरम्यान आहे. टेक्सटाईल उपयोगासाठी प्रसिद्ध आलेल्या मालेगाव मध्ये जवळजवळ तीन लाखाच्या आसपास यंत्रमाग आहेत पण टाळेबंदीमुळे वस्त्रोद्योग ठप्प झाला आहे.

“सरकारने आम्हाला धान्य तरी द्यावे किंवा लॉकडाउन  उठवून लोकांना काम करायची मुभा द्यावी. तुम्ही धान्यही देणार नाही हि आणि कामही करू देणार नाही म्हणजे लोकांनी कराव काय? इथे परिस्थिती फार बिकट आहे. आज गरीब लोक जिवंत आहेत हीच मोठी गोष्ट आहे. हातावर पोट असणाऱ्या मंडळींची अवस्था फार वाईट आहे कारण हे लोक रोज कमवायचे आणि रोज खायचे. त्यांच्यावर तर अक्षरशः भीक मागून जगायची वेळ आली आहे,” असे इस्माईल म्हणाले. आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनासुद्धा फोन करून मदतीची मागणी केली आहे.

त्यांनी आरोप केला की वारंवार सांगून सुद्धा मालेगाव महानगरपालिकेने महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शहरात येणाऱ्या लोकांचे आरोग्य तपासणीची व्यवस्था केलेली नाही. मालेगावातले बरेचसे लोक हे मुंबई पुणे पिंपरी-चिंचवड या ठिकाणी वास्तव्य करतात. ही महामारी सुरू झाल्यानंतर हे लोक परत आपल्या गावी आले आणि आणि कदाचित यांच्यामार्फत करोनाने मालेगाव मध्ये शिरकाव केला असावा. इस्माईल म्हणाले योग्य वेळेवर जर उपाय योजना करण्यात आल्या असत्या तर ही वेळ आली नसती.

त्यांच्या म्हणण्यानुसार मालेगाव मध्ये करोना चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर महापालिकेने मागचापुढचा विचार न करता बँक एटीएम खासगी रुग्णालय आणि मेडिकल बंद केले. याचा लोकांना प्रचंड त्रास झाला आणि असंतोष निर्माण झाला. त्याच बरोबर जे लोक करणामुळे मृत्यू पावले आहेत त्यांच्या कुटुंबांना सुद्धा सरकारने मदत करावी आणि करोना ग्रस्तांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या हॉस्पिटलमधल्या बेडची संख्या सुद्धा वाढवावी अशीसुद्धा इस्माईल ह्यांची मागणी आहे.