महाराष्ट्राला बुलेट ट्रेन द्यायचीच असेल तर ती राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारी द्यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याचप्रमाणे सध्याच्या मुंबई- सूरत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उपयोग नाहीय असं मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात सरकार म्हणून सर्व पक्षांनी एकत्र बसून चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली. याच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेन या विषयावरील आपली मतं रोखठोकपणे मांडली.

राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असताना कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेन या दोन प्रकल्पांसंदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले. “बुलेट ट्रेनची गरज नाही असं आपणही म्हणाला होता, शरद पवारही म्हणाले होते. बुलेट ट्रेनमध्ये आपल्या राज्याला फायदा नसून आपल्या राज्याने यामध्ये गुंतवणूक करणं बरोबर नाही, असं मत मांडण्यात आलं होतं. तरीही ६० टक्के जमीन संपादन आतापर्यंत झालं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य काय?,” असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

नक्की वाचा >“…तर मी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करेन”; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा

“मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन द्या…”

राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई- नागपूर अशी बुलेट ट्रेन देण्याची मागणी केंद्राकडे केली. “प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते अनेक बाजू असतात. यामध्ये आपण स्थानिक लोकांचा विचार करणं फार महत्वाचे आहे. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता राज्याला असेल तर माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझ्या राजधानीला आणि उप-राजधानीला जोडाणारी बुलेट ट्रेन द्या. यामुळे विदर्भासंदर्भात कारण नसताना दुरावा निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय, ज्याला शिवसेना प्रमुखांचे नाव दिलं गेलं आहे, तशीच मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन मला द्या. मला त्याचा खूप आनंद होईल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> मी घरात बसून राज्यासाठी १६ हजार कोटींची गुंतवणूक आणली : उद्धव ठाकरे

“सध्याच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उपयोग नाही”

“सूरत मुंबई बुलेट ट्रेनचं भविष्य काय?”, असं राऊत यांनी विचारलं असता. “तिचा सध्या काही उपयोग नाहीय. याची सध्या काही आवश्यकता नाहीय. पण भूसंपादन करते वेळी जिथे विरोध झाला आहे, ज्यांचा विरोध आहे त्यांच्यामागे शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून जे काही करायचं आहे तो निर्णय आपण घेऊच पण ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्यांच्यामागे शिवसेना आहे.

नक्की वाचा >> “आज गुंतवणूक नाकारुन उद्या चिनी राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात गळे घालून मिरवणार असाल तर…”

नक्की वाचा >>  “उद्योगधंद्यांबद्दल सरकारी धोरणे योग्य नसतील तर…”; मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा निशाणा 

कोस्टल रोड होणारच

याच मुलाखतीमध्ये राऊत यांनी कोस्टल रोड प्रकल्पासंदर्भात प्रश्न विचारला असता त्याचे काम सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. “तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री नव्हता तेव्हा काही प्रकल्पांच्या बाबतीत तुम्ही लक्ष घातलं होतं. विशेष: मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्प. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहिली तर कोस्टल रोड होणार आहे की नाही?,” असा थेट राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. “कोस्टल रोडचं काम चालू आहे की. कोस्टल रोडचं काम कुठेही थांबलेलं नाही. कोस्टल रोडचं काम जोरात सुरु असून त्यासाठी आपण पैशांचे नियोजन करुन ठेवलेलं आहे,” असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.