18 October 2019

News Flash

‘मराठवाडय़ाला निर्धारित पाणीवाटा देण्यात यावा’

मराठवाडा, नगर-नाशिक व महाराष्ट्र यांच्यात बाभळी बंधाऱ्याच्या विवादावरील निर्णयाप्रमाणे त्रिपक्षीय करार करून जायकवाडी व माजलगाव प्रकल्पांसाठी यापूर्वी निर्धारित केलेला पाणीवाटा देण्यात यावा, अशी मागणी राजन

| July 11, 2014 01:30 am

मराठवाडा, नगर-नाशिक व महाराष्ट्र यांच्यात बाभळी बंधाऱ्याच्या विवादावरील निर्णयाप्रमाणे त्रिपक्षीय करार करून जायकवाडी व माजलगाव प्रकल्पांसाठी यापूर्वी निर्धारित केलेला पाणीवाटा देण्यात यावा, अशी मागणी राजन क्षीरसागर यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर मांडली.
प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पाला पाण्याचा न्याय्य वाटय़ासंबंधी विवादाबाबत सुनावणी सुरू केली. आमदार प्रशांत बंब यांच्या अर्जाबरोबरच क्षीरसागर यांची सहयाचिका दाखल आहे. यासंबंधी बुधवारी याचिकाकत्रे, प्रतिपक्ष व सरकार यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुंबईत जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सुनावणी चालवली.
या वेळी क्षीरसागर यांनी मराठवाडय़ाची बाजू भक्कमपणे मांडली. जायकवाडी प्रकल्पात वरच्या बाजूच्या अपूर्ण व पाणीवापर निर्धारित न केलेल्या धरणांचे दरवाजे संपूर्ण उघडे ठेवून, तसेच वरच्या बाजूच्या अन्य प्रकल्पांमधून अंशत: पाणीप्रवाह चालू ठेवून जायकवाडी प्रकल्पाला खात्रीशीर पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा, या साठीच्या अर्जावर प्राधिकरणाने बुधवारी मुंबईत सुनावणी केली. सुनावणीत क्षीरसागर यांनी प्रादेशिक असमतोल व सिंचन अनुशेष निर्मूलनासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यातील कलम २१ (१) अन्वये व कलम १२नुसार मराठवाडय़ाची बाजू मांडली. परभणी जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पाखालील १८३ गावांसाठी व माजलगाव प्रकल्पासाठी सिंचन कार्यक्रम वर्षांनुवष्रे तयारही केले जात नसल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. जायकवाडी विभाग दोनमध्ये ४३ शाखा अभियंते पदे मंजूर असताना केवळ १० शाखा अभियंते ठेवून सिंचन व्यवस्थापन मोडीत काढण्यात सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.
याला विरोध करण्यासाठी पद्मश्री विखे सहकारी साखर कारखाना, संजीवनी साखर कारखाना, अशोक साखर कारखाना यांसह अन्य विरोधकांनी मराठवाडय़ात परतीचा मान्सून येतो. कायद्यातील कलम १२ चुकीचे आहे आदी आक्षेप नोंदविले. हे आक्षेप हास्यास्पद असून त्यास कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

First Published on July 11, 2014 1:30 am

Web Title: give water share to marathwada
टॅग Marathwada,Parbhani