सध्या युवती करीअरच्या मागे पळत असून घर, आई, वडील व नातेवाइकांना विसरत चालल्या असल्याची खंत वाटते. माझ्या लग्नानंतर मी माझे आई-वडील व सासू-सासरे यांचा चांगला सांभाळ करीन. मंजिरी रडकी नव्हती. तिने आपल्या हिमतीवर तिच्या नव-याला परत मिळविले. त्याच पद्धतीने आजकालच्या युवतींनी वागले पाहिजे, असे प्रतिपादन ’तू तिथे मी’ फेम अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने केले.
पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शहर व परिसरात उल्लेखनीय काम करणा-या सात महिला व युवतींचा मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी मृणाल बोलत होती. अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवर महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात नगराध्यक्ष राजश्री ससाणे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांपासून जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्ताने शहर व परिसरातील महिला बचतगटांना खाद्यमहोत्सवात सहभागी होऊन उत्पन्नाचे साधन प्राप्त होत आहे. शहराचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तीन दिवस दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे महिला व युवतींना या कार्यक्रमाचा लाभ घेता येतो.
समितीच्या सभापती रागेश्वरी मोरे, उपसभापती मंगला तोरणे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. थत्ते मैदान येथे झालेल्या या गौरव पुरस्कार सोहळ्यात सात महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान  दीपक विघावे यांच्या पत्नी ज्योती विघावे, स्वत: अल्पशिक्षित असूनही मुलांना उच्चशिक्षण देऊन त्यांना डॉक्टर, वकील व व्यावसायिक बनविल्याबद्दल अंजनाबाई हिरालाल चुडिवाल, प्रसिद्ध आचारी नारायण महाराज यांच्या पत्नी  जनाबाई नारायण नाबरिया यांनी या व्यवसायाचा वारसा पुढे कायम चालू ठेवल्याबद्दल, पतीच्या निधनानंतर कापड व्यवसाय खंबीरपणे पाहात असलेल्या सुदेश कौर जसपालसिंग बतरा, शेतकरी कुटुंबातील बेलापूर येथील निर्मला मारुतराव राशिनकर हिने मुख्याधिकारी परीक्षा पास होऊन उच्चपदावर जाण्याचा मान मिळवल्याबद्दल, जिल्ह्य़ात वाढपी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून सध्या सुमारे ६०० महिलांना रोजगार उपलब्ध करून देणा-या शकुंतला नामदेव शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली देशमुख यांनी केले, तर आभार नगरसेविका राजश्री सोनवणे यांनी मानले. या वेळी व्यासपीठावर नगरसेविका कांचन सानप, संगीता मंडलिक, शालिनी दुसानीस, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, पक्षप्रतोद संजय फंड, तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, नगरसेवक अंजुमभाई शेख, मुजफ्फ़र शेख उपस्थित होते.