दुष्काळग्रस्त मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक येथील चार धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश शनिवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाकडून देण्यात आले. पाटबंधारे विभाग आणि औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार ३१ ऑक्टोबरपूर्वी हे पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याला काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे त्यामध्ये मुळा, प्रवरा, गंगापूर आणि गोदावरी-दारणा या धरणांचा समावेश आहे. जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या एकूण १२.८४ टीएमसीमध्ये मुळा धरणातून १. ७४, प्रवरामधून ६.५०, गंगापूरमधून १.३६ आणि गोदावरी-दारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या ३.२४ टीएसमी पाण्याचा समावेश आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार समन्यायी पाणी वाटपासाठी होणाऱ्या बैठकीपूर्वी पाणीसाठय़ाचा अंदाज घेतला असता धरण ३७ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे, याचा आराखडा मेंढेगिरी समितीने ठरवून दिला होता. तोच आराखडा वापरून समन्यायी पाणी वाटप करावे, असे स्थायी आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले आहेत. जायकवाडी जलाशयात सध्या केवळ ६ टक्के साठा आहे. पहिल्या धोरणानुसार १५ ऑक्टोबरला मुळा धरण समूहात ४९ टक्क्य़ांपेक्षा अधिक, प्रवरामध्ये ५६ टक्के, गंगापूरमध्ये ६१ टक्के, दारणामध्ये ६४ टक्के, पालखेडमध्ये ७३ टक्क्य़ांपेक्षा अधिक पाणी असेल तर अधिकचा हिस्सा जायकवाडीत सोडावा, असे निर्देश आहेत.