कोल्हापूर  : शेतक ऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘गोकुळ’ने आज आपल्या गाय आणि म्हशीच्या दूध विक्री किमतीत २ रुपयांची वाढ केली आहे. यापुढे ‘गोकुळ’च्या गायीच्या दुधाची ग्राहकांसाठी विक्री किंमत ही ४५ रुपये, तर म्हशीच्या दुधाची विक्री किंमत ही ५६ रुपये लीटर अशी राहणार असल्याचे संघाच्या वतीने कळविण्यात आले आहे. ही दर उद्यापासून अंमलात येणार आहे. दूध दरवाढीसाठी नुकतेच राज्यव्यापी आंदोलन झाले. या आंदोलनाची दखल घेत शासनाने दूध उत्पादकांकडून खरेदीच्या दरात वाढ केली. गायीचे दूध प्रतिलीटर २५ रुपयांना खरेदी करण्याचे आदेश शासनाने जाहीर केले. दूध खरेदीच्या या वाढीव दरामुळे ‘गोकुळ’ने आपले विक्रीचे दर आजपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.