धुळ्यातील साक्री शहरात जळीतकांडाची घटना घडली आहे. पाटबंधारे विभागात वाहनचालक पदावर काम करणाऱ्या गोकुळ रतन माळी यांना त्यांच्या कारमध्ये जिवंत जाळण्यात आले आहे. संपत्तीच्या वादातून गोकुळ माळींच्या चुलत भावांनी त्यांची निर्घृण हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होतो आहे.

रविवारी सकाळी साक्रीमध्ये गणेश माळी यांचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला. या हत्याकांडानंतर साक्री शहर हादरुन गेले आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ माळी हे ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होणार होते. माळी हे माजी मंत्री छगन भुजबळांचे निकटवर्तीय होते. याआधीही माळी यांना दोन वेळा धमकवण्यात आले होते. गोकुळ माळी यांना नंदुरबार येथील त्यांच्या हिश्श्याचे घर विकायचे होते. मात्र त्यांचे भाऊ आणि बहिणी या व्यवहारासाठी आवश्यक सहकार्य करीत नव्हते, असे म्हटले जाते आहे.

संशयितांनी माळी यांना संपविण्याचा विचार केला असावा, या अनुषंगाने पोलिसांनी प्रथमदर्शी तपासाचा रोख ठेवला आहे. मृत गोकुळ माळी हे समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष होते. साक्री पाटबंधारे विभागात ते वाहनचालक या पदावर कार्यरत होते. ही घटना साक्री पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच घडली. मृत माळी यांचा मुलगा धीरज याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मृत गोकुळ माळी यांचा मुलगा धनंजय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यापूर्वीही दोन जणांनी ३ डिसेंबर २०१६ रोजी त्यांना धमकावले होते. आमच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी त्यांना देण्यात आली होती. या नंतर पुन्हा १७ डिसेंबर रोजीही अशीच धमकी देण्याची घटना घडली होती.