कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) बहुराज्य करण्याच्या विषयावरून जिल्ह्य़ाचे राजकारण तापले आहे. सभेची ३० तारीख (रविवार) जवळ येईल, तसतशी  दुधाच्या राजकारणाला उकळी येत चालली आहे. सत्तारूढ आणि विरोधी गटाचा आक्रमक पवित्रा पाहता जिल्हा प्रशासन, पोलीस आणि सहकार विभागासमोर ही सभा म्हणजे एक आव्हानच बनली आहे .

राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा गोकुळ दूध संघ आता बहुराज्य संस्था बनण्याच्या मार्गावर आहे. गोकुळच्या ५६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दूध संघ मल्टिस्टेट (बहुराज्यीय सहकारी संघ) करण्याचा ठराव मांडण्यात येणार आहे. त्यासाठी २१ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा होणार होती. पण सभेपूर्वी झडत असलेला वाद पाहून जिल्हा प्रशासनाने गणेश उत्सवाचे कारण देत सभा ३० सप्टेंबपर्यंत पुढे ढकलली आहे. गोकुळच्या करवीर तालुक्याच्या संपर्क सभेवेळी विरोधकांना झालेली मारहाण पाहता याची चुणूक आधीच दिसून आली आहे.

बहुराज्यमुळे गोकुळ नांदणार

गोकुळ दूध संघामुळे ग्रामीण भागाला बरे दिवस आले. एकेकाळी ६५० लिटर दूध संकलन करणाऱ्या गोकुळने गत ५५ वर्षांच्या काळात प्रतिदिन १२ लाख लिटर संकलनापर्यंत मजल मारली आहे. गोकुळने आता २० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करणारा प्रकल्प हाती घेतला असून विस्तारीकरणासाठी ११० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. साहजिकच, दुधाची गरज मोठय़ा प्रमाणात भासणार आहे. त्यातूनच गोकुळला बहुराज्य दर्जा देऊन शेजारचे जिल्हे, कर्नाटक येथून दूध आणण्याचे नियोजन चालवले आहे.  सत्तारूढ गटाने बहुराज्यचे फायदे सांगण्यास सुरुवात केली आहे. गोकुळ बहुराज्य होण्यामुळे कार्यक्षेत्र विस्तारित होईल, दूध संकलन वाढेल, असा विश्वास संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. अमूल, नंदिनी, पतंजली तसेच मदर डेअरी यासारख्या परराज्यातील संस्थांशी समर्थपणे टक्कर देता येईल. संघाचा नफा वाढेल आणि शेतकऱ्याला दूध दर अधिक मिळून शेतकऱ्यांच्या घरात गोकुळ नांदेल. राज्य सहकारी कायदा आणि बहुराज्य कायदा दोन्हीमध्ये विशेष फरक नसल्याने कोणाच्या अस्तित्वावर घाला येण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. दोन्हीकडे सर्व नियम, तरतुदी सारख्याच आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांच्या हक्क, अधिकार, कर्तव्य याला कोणतीही बाधा येणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

विरोधकांचा हल्लाबोल

गोकुळ बहुराज्य करण्याचा ठराव व्हावा यासाठी  ‘गोकुळ’चे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.एन. पाटील व खासदार धनंजय महाडिक यांनी कंबर कसली आहे. तर हा ठराव होऊ  नये म्हणून माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार राजू शेट्टी, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी. पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

विरोधकांनी संघ बहुराज्य झाल्यास दूध सभासदांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. संघ बहुराज्य झाल्यानंतर सहकारी संस्थांचे महत्त्व संपणार असून, व्यक्ती सभासद होणार आहेत. सोयीचे हवे तितके सभासद करून घेतले की आताच्या सभासदांची गरजच उरणार नाही. नव्या सभासदांच्या आधारे सत्तासोपान गाठणे सहज शक्य आहे. शिवाय शासनाची बंधनेही तीव्र स्वरूपाची राहणार नसल्याने मलईदार कारभार बिनदिक्कतपणे सुरू राहील, असा आक्षेप विरोधकांनी नोंदवला आहे.

‘गोकुळचे लोणी मटकावून गब्बर झालेल्या महाडिकांनी या संघाला स्वत:च्या व्यापाराचे स्वरूप दिले. त्यामुळे  ‘गोकुळ’मध्ये त्यांचा जीव अडकला आहे, असे नमूद करून सतेज पाटील यांनी गोकुळ बहुराज्य करण्याला दूध उत्पादकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून महाडिक वाट्टेल ते बोलत आहेत. वादग्रस्त बहुराज्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी वार्षिक सभेत जनविरोध तीव्रतेने उमटणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

तालुका संघाच्या उदयाची चिन्हे

आजवर गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संघ असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय नव्याने जिल्हा किंवा तालुका दूध संघ काढता येत नव्हता. किंबहुना गोकुळनेच न्यायालयात धाव घेऊन असा निर्णय पदरात पाडून घेतला होता. आता संघ स्वत:च चR  बदलालायला निघाला असला, तरी त्यातून ते स्वत:ला स्पर्धक निर्माण करत आहेत. आता गोकुळ बहुराज्य संस्था झाली तर नवीन जिल्हा व तालुका दूध संघ उदयास येऊ  शकतात. त्यासाठी ‘गोकुळ’कडून परवानगी घेण्याची गरज उरणार नाही.

सहकार क्षेत्रावर राळ

विरोधकांनी गोकुळच्या मलईदार कारभारावर चर्चा सुरू ठेवल्याने महादेवराव महाडिक यांचा तिळपापड झाला. त्यांनी मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्हा बँकेतील संचालकांची दुबईवारी, सतेज पाटील यांच्या साखर कारखान्यातील सभासद कमी करणे,  संजय मंडलिक यांच्या महालक्ष्मी दूध संस्थेचा तोटा यावर हल्ला चढवला. त्याला विरोधकांनी प्रतिउत्तर दिले. दुबईवारी स्वखर्चाची असल्याचे सांगत मुश्रीफ यांनी महाडिकांवर ५ कोटींचा खटला भरणार असल्याचे आव्हान दिले. महाडिक यांच्या गोपाळ दूध आणि भीमा कारखान्याच्या गैरकारभाराचे वाभाडे विरोधकांनी काढले आहेत.