कोल्हापूर: राज्यातील सर्वात मोठी सहकारी दूध संस्था असलेल्या गोकुळने शुक्रवारी साडेचार लाख दूध उत्पादकांना गोड भेट दिली. म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची तर गाय दुधात एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याचवेळी कोल्हापूर विभाग वगळता मुंबई-पुणे या महानगरातील दूध विक्रीत दोन रुपयाने वाढ केली आहे. राज्यात अन्यत्र दूध खरेदीमध्ये कपात होत असताना गोकुळने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा धाडशी निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी विरोधी गटाने सत्तेवर आल्यानंतर दोन महिन्यात दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. आज त्याची पूर्तता केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय संजय मंडलिक, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली.

प्रतिदिन बारा लाख लिटर दूध खरेदी

सतेज पाटील म्हणाले, गोकुळची सध्या दररोज प्रतिदिन बारा लाख लिटर दूध खरेदी होत आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दूध उत्पादकांना म्हैस दुधात दोन रुपये तर गाय दुधात एक रुपयाची वाढ करण्यात येत आहे. तर दूध विक्रीमध्ये कोल्हापूर विभागातील दोन लाख लिटर विक्री होणारा कोल्हापूर, सांगली, कोकण भाग वगळता इतरत्र दरवाढ होणार आहे. पुणे-मुंबई येथे टोंड, स्टॅंडर्ड प्रकार वगळता इतर दुधामध्ये दोन रुपये वाढ होत आहे. मुंबईमध्ये दुधाची विक्री प्रतिदिन आठ लाख लिटर तर पुणे येथे तीन लाख लिटर विक्री होत आहे.

गोकुळची दूध विक्री वीस लाख लिटर करण्याचे उद्दिष्ट

५०० कोटीचे कर्ज वाटप गोकुळच्या म्हैस दुधाला राज्यात मोठी मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन हे दूध वाढवण्याकडे गोकुळने लक्ष दिले आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील महामंडळ मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्यासाठी असणार्‍या सर्व मंडळाच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. गोकुळची दूध विक्री वीस लाख लिटर करण्याचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी दोन लक्ष लिटर वृद्धी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.