दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला पाठींबा म्हणून एक दिवस सकाळच्या सत्रातील दूध संकलन करण्याचा निर्णय ‘गोकुळ’ला मागे घेण्याची वेळ आली आहे. गोकुळने उद्या मंगळवारी दूध संकलन चालू ठेवावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस दुग्ध विभागाचे प्रभारी विभागीय उपनिबंधक परब यांनी पाठवली. त्यांच्या पत्रामुळे गोकुळ व्यवस्थापनाने पवित्रा बदलला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दुधाला दर मिळण्यासाठी २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. त्याला गोकुळ दूध संघाने पाठिंबा देत मंगळवारी सकाळचे दूध संकलन होणार नाही, असे सांगण्यात आले होते. यावर गोकुळने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी तक्रार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालयाकडे केली होती. त्याची दखल घेत या कार्यालयाने गोकुळला नोटीस बजावत मंगळवारी दूध संकलन चालू ठेवण्याविषयी कळवले आहे.

महानगरांचा दुध पुरवठा अखंडित

शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. दूध संघ शेतकऱ्यांचा असल्याने पाठिंबा दिला होता, असे गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले. दरम्यान, गोकुळचे ५ लाख लिटर दूध संकलन थांबले असते, तर काही प्रमाणात मुंबई, पुणे आदी महानगरातील दुध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होती