सोन्याची जेजुरी असं जेजुरी नगरीला म्हटलं जातं कारण इथे जो भंडारा उधळला जातो त्यामुळे या नगरीला सोन्यासारखंच स्वरूप येतं. आता याच सोन्याच्या जेजुरीतील मुख्य मंदिराच्या कळसावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. यासाठी दीड किलो सोन्याचा वापर केला जाणार आहे. खंडेरायाच्या मंदिराला सोन्याच्या कळस बसवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

जेजुरी देवस्थानच्या वतीने धार्मिक विधी करत कळस बसवण्याच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. खंडोबा देवस्थानाच्या ताब्यात असलेल्या सोन्याच्या अलंकारासहीत इतर चीज वस्तूंमधून मंदिरावरचा सोन्याचा कळस साकारण्यात येणार आहे. दीड किलो शुद्ध सोन्याचा वापर कळसाच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे.

कळस तयार करण्यासाठी राजस्थानहून कुशल कारागीरही बोलवण्यात आले आहेत. आता आठवडाभर कॅमेराच्या देखरेखीखाली हे काम चालणार आहे. पुराण काळापासून जेजुरी ही सोन्याची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. आता याच सोन्याच्या जेजुरी मंदिरावर सोन्याचा कळस बसवला जाणार आहे. पुढच्या आठवड्यात होणारी सोमवती यात्रा आणि त्यानंतर नवरात्र आणि दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.