सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा परळी शहरात नागरी सत्कार झाला. स्वागतासाठी शहरभर फुलांच्या कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सोनारगल्लीने थेट सोन्याचे दागिने लावून कमान उभारली, तर शिवाजी चौकात १७४ किलोचा हार जेसीबीने घातला. शहरात पाच तास मिरवणूक चालल्याने अखेर ध्वनिक्षेप नियमाने कार्यक्रमस्थळी भाषण न करताच मुंडेंनी मध्यरात्रीपर्यंत स्वागत स्वीकारले.

बीडचे पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे शुक्रवारी रात्री परळी शहरात जोरात स्वागत करण्यात आले. नागरी सत्कारासाठी सायंकाळी सहा वाजता मंत्री मुंडे यांचे शहरात आगमन झाले. फुलांनी सजवलेल्या उघडय़ा जीपमधून मिरवणूक निघाली. शहरातील सोनारलाइन रस्त्यावर सुवर्ण अलंकारची कमान उभारली होती.

याबाबत सुवर्णकार समाजाचे नेते सुरेश टाक यांनी सांगितले, परळीत १९८९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत अशीच सोन्याची कमान लावून करण्यात आले होते. कमानीवर सोन्याची एकदाणी, पट्टी गंठण, रानी हार, नेकलेस, चेन पट्टी, माणिक-मोती असे प्रत्येकी पाच तोळ्यांचे दागिने सुवर्णकार बांधवांकडून जमा करून लावण्यात आले. कमानीजवळ सीसीटीव्ही कॅमेरे आणि खासगी सुरक्षारक्षक नेमलेले होते.

सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगड येथे जाऊन दिवंगत काका स्व. गोपीनाथ मुंडे व वडील स्व. पंडितराव मुंडे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले.