‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये मागील आठवडय़ाच्या तुलनेत सोन्याच्या दरात हजार रुपयाने घसरण झाल्याने सोने खरेदीसाठी ग्राहकांची नेहमीपेक्षा अधिक गर्दी होत असल्याचे येथील सराफी बाजारपेठेत दिसून येत आहे. सोन्याच्या दरातील घसरण पुढील काही दिवस सुरूच राहण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
नेहमीपेक्षा दीपावलीत यंदा सोन्याचे दर कमी राहिल्याने ग्राहकांचा इतर वस्तूंपेक्षा सोने खरेदीकडे अधिक कल राहिला. परंतु दीपावलीनंतरही सोन्याचे दर आणखी घसरल्याने सराफी बाजारातील ग्राहकांची गर्दी कायम आहे. शनिवारी येथील बाजारपेठेत सोन्याचे दर १० ग्रॅमसाठी २७ हजार ५०० रुपये होते. आदल्या दिवशीच्या तुलनेत हे दर किमान २०० रुपयांनी अधिक राहिले. शुक्रवारी हेच दर २७ हजार ३२० रुपये असे होते. दिवसभरातील घडामोडींनुसार दर एक तासाला या दरांमध्ये काहीसा फरक पडत असल्याचे सराफ व्यावसायिकानी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोने आणि चांदीच्या क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. अमेरिकेने स्वत:चे तेल उत्पादन वाढविल्याने डॉलर मजबूत झाला. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर होऊन सोन्याचे दर कमी झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आखाती देशातील शांततेमुळे तेथील तेल उत्पादन वाढल्यामुळे तेलाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भाव कमी झाले आहेत. त्याचाही परिणाम सोने-चांदीच्या व्यापारावर होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी नमूद केले.
चांदीचे दर मागील आठवडय़ात प्रती किलो ३९ हजार ५०० रुपये तर शनिवारी हेच भाव ३८ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आले.