पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्यापैकी काही गुन्हे सांगवी पोलिसांनी उघड केले असून दोन सराईत चोरांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांचे १६ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहेत. महेश तुकाराम माने( वय-२१) आणि गणेश हनुमंत मोटे (वय-२०) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. ते सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान  सोनसाखळी चोरायचे. यासंदर्भात अनेक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गुन्हेगार उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील आहेत. सांगवी पोलीस ठाण्याच्या समोरील चौपाटी येथे मिळेल ते काम करायचे. मात्र, त्यांनी गुन्हेगारीचा अवलंब करत हळूहळू सोनसाखळी चोरण्यास सुरूवात केली.

दरम्यान, संबंधित आरोपी हे राहत्या घरातून पसार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक त्यांचा शोध घेत होते. तेव्हा पोलीस कर्मचारी अरुण नरळे यांना माहिती मिळाली की आरोपी महेश हा पिंपळे निलख येथे येणार आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे, अरुण नरळे यांच्या पथकाने तेथे जाऊन सापळा रचला. आरोपी महेश माने शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली, तेव्हा आरोपी गणेश मोटे याचे नाव समोर आले. त्याच्या साथीने संबंधित गुन्हे केल्याच आरोपी महेशने सांगितले.

त्यांच्याकडून सोनसाखळीचे चोरीचे दहा तर दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत.  ७ लाख रुपयांचे १६ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सोन्याचे दागिने दोन्ही आरोपींच्या घरी मिळाले असून काही सोने सोनारकडे मिळाले आहेत. महेश हा त्याच्या आईला घेऊन सोनारकडे चोरीचे सोने विकत असे. त्यामुळे सोनाराला संशय येत नव्हता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुळीग,पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजने, रोहिदास बोऱ्हाडे, अरुण नरळे, शशिकांत देवकांत, विनायक देवकर, नितीन खोपकर, अनिल देवकर, हेमंत गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.