विजय पाटील

जैवविविधतेने समृद्ध म्हणून महत्त्वाचे स्थान असलेल्या पश्चिम घाट प्रदेशातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ सोनेरी बेडूक आढळला आहे. या प्रजातीची पश्चिम घाटातील ही तिसरी, तर या जंगलातील ही पहिलीच नोंद आहे.

मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि हेमंत केंजळे हे सध्या सह्यद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या या सर्वेक्षणामध्ये जंगलाच्या दुर्गम भागातील एका धबधब्यावर या सोनेरी बेडकाचे त्यांना अस्तित्व आढळले. बेडकाची ही प्रजाती दुर्मीळ असून, त्याची आजवर यापूर्वी पश्चिम घाटात दोनदाच सिंधुदुर्ग आणि आंबोली येथे नोंद झालेली आहे. तर सह्यद्री व्याघ्र प्रकल्पात या प्रजातीचे घडलेले हे पहिलेच दर्शन आहे.

सन २०१४ मध्ये दिल्ली विद्यापीठाचे डॉ. बिजू दास व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतातील लुप्त झालेल्या सात नवीन उभयचर बेडूक प्रजातींचे शोध लावले होते. त्यामध्ये या सोनेरी बेडकाची नोंद घेतली गेली आहे. सिंधुदुर्गमध्ये सापडलेल्या या बेडूक प्रजातीस आघाडीचे वन्यजीव छायाचित्रकार डॉ. सीझर सेनगुप्ता यांच्या सन्मानार्थ ‘इंडोसिल्व्हिराना सीझरी’ असे नाव देण्यात आले. मराठी भाषेत याला ‘सोनेरी पाठीचा बेडूक’ असे नाव दिले गेले. या जातीचा बेडूक आजवर यापूर्वी दोनदाच आढळल्याने त्याच्याविषयी फारसा अभ्यास झालेला नाही. हा बेडूक प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजेच जगात तो फक्त पश्चिम घाटातच आढळतो. अशा या प्रजातीचे दर्शन घडल्याने आता त्याच्या अभ्यासास गती मिळेल असा आशावाद अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

प्रदेशनिष्ठ जैवविविधतेचा आढावा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा दहा वर्षीय आराखडा अद्ययावत होणार आहे. त्यासाठी वन्यजीव विभागाने कोयना व चांदोली अभयारण्य क्षेत्रातील प्रदेशनिष्ठ वनस्पती, वन्यजीव, तसेच जैवविविधतांचा आढावा व शोध घेणे सुरू केले आहे. हा आराखडा परिपूर्ण असावा म्हणून क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, सहवनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल गोविंद लेंगुटे आदींनी पुढाकार घेऊन या कामाला चालना दिली आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखालील पहिल्याच पाहणी दौऱ्यात या दुर्मीळ सोनेरी बेडूक प्रजातीचे दर्शन झाले.