गडचिरोली :करोना संक्रमनाचे संकट बघता गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांनी मुलाखती घेण्याची परवानगी नाकालर्याने अगदी सुरुवातीपासूनच या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहूर्ले यांनी गुरुवारी यासंबंधीचे नोटिफिकेशन जारी करीत स्थगितीवर शिक्का मोर्तब केले आहे.

गोंडवाना विद्यापीठाने २० मार्च २०२० रोजी जाहिरात प्रकाशित करुन पदव्युतर विभागासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविले होते. ३६ पदांसाठी तब्बल ६४२ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५६२ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. दरम्यान या भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा नसल्याने ही पदभरती रद्द करावी, या मागणीसाठी सिनेट सदस्य ऍड. गोविंद भेंडारकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यंतरी उच्च न्यायालयाच्या नागपूर विद्यापीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना अर्ज करणे, छाननी इत्यादी प्रक्रिया सुरु ठेवता येईल, मात्र पुढील आदेशापर्यंत मुलाखत घेता येणार नाही, असे आदेश दिले होते. राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघानेही ही भरती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने अर्जांची छाननी प्रक्रिया नुकतीच पार पाडली.अशातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात टाळेबंदी लागू आहे.

अशा परिस्थितीत अनेक इच्छूक उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकणार नाही, त्यामुळे ही पदभरती तूर्तास रद्द करून टाळेबंदी उठल्यावर घ्यावी, याकरिता शिक्षण मंच संघटनेशी संबंधित सिनेट सदस्य आग्रही होते. त्यांनी राज्यपालांकडे पदभरती स्थगित करण्याची मागणी केली होती. भरतीला सर्वत्र विरोध होत असतानाही कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकार यांनी भरती प्रक्रिया सुरूच ठेवले. मुलाखतीसाठी पॅनल तयार केले. पात्र उमेदवारांची यादी लावली.तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे मुलाखती घेण्यासाठी परवानगी मागितली.गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे कुलगुरू यांचा नाईलाज झाला.

कुलगुरू कल्याणकर यांचा कार्यकाळ 6 सप्टेंबर रोजी संपत आहे. एक महिन्याच्या कालावधीत हे सर्व शक्य नाही. उपरोक्त सर्व बाबी लक्षात घेऊन अखेर ही भरती रद्द करण्यात आल्याचे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी काढले आहे.त्यामुळे भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणे, मुलाखत घेणाऱ्या तज्ज्ञांची नेमणूक करणे, त्यांना आमंत्रित करणे, मुलाखतीची तारीख निश्चित करणे आणि उमेदवारांची निवड करणे इत्यादी बाबी पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रिया स्थगितीमूळे कुलगुरू कल्याणकार याना चांगलाच धक्का बसला आहे.