सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या लहान मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या तिघांना गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक आरोपी हा आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचा दावा करत असून या अटकेच्या निषेधार्थ मंगळवारी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. या अटकेमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला, असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गोंदियातील गोरेगाव तालुक्यात घोटी येथे राहणाऱ्या आदित्य गौतम (वय ८) या आठ वर्षांच्या मुलाचा रविवारी सर्पदंशामुळे मृत्यू झाला. बाई गंगाबाई रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मात्र, मुलाच्या नातेवाईकांनी बालाघाट येथील नवीन लिल्हारेशी संपर्क साधला. नवीन हा आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचा दावा करतो. आदित्यला २४ तासांमध्ये जिवंत करतो, असा दावा नवीनने केला. नवीन आणि त्याचे दोन सहकारी सोमवारी रात्री बालाघाटवरुन घोटी गावात पोहोचले. मात्र, गावात येताच गोरेगाव पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येत नाही. त्यामुळे हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांच्या या कारवाईचा ग्रामस्थांनी विरोध केला. गुरुवारी संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांनी नवीन आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केल्याने आदित्यला पुन्हा जिवंत करता आले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. गोंदिया-कोहमारा मार्गावर चक्काजाम आंदोलन करत काही काळ वाहतूक रोखली. जमावाने टायरची जाळपोळ केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. त्यामुळे गोरेगाव येथे तणावपूर्ण वातावरण आहे. गावात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.