एकीकडे राज्याने एक लाख करोनाबाधित रुग्णांची संख्या ओलांडली असतानाच एक दिलासादायक बातमी आहे. गोदिंया जिल्हा पुर्णपणे करोनामुक्त झाला आहे. गोंदियामधील सर्व ६८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा करोनामुक्त झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. तर परभणी, वर्धा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यातील रुग्णसंख्या १०च्या आत असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

गोंदिया जिल्ह्यात एकूण ६८ करोनााधित रुग्ण होते. या सर्वांनी करोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे गोंदियातील करोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. विशेष म्हणजे गोंदियात एकाही रुग्णाचा करोनाने मृत्यू झालेला नाही.

आणखी वाचा- यवतमाळ शहराची करोनामुक्तीकडे वाटचाल

राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १४१ झाली आहे. गेल्या २४ तासांत १७१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार ७९६ झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ७१७ रुग्ण उपचारादरम्यान दगावले असून १२ रुग्णांचा इतर कारणांनी मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी करोनाच्या ३४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४९ हजार ६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.