मर्जीतील व्यक्तीची वर्णी लागण्यासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज बाद

सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेवरून वादग्रस्त ठरलेले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी कुलसचिव व लेखाधिकारीपदासाठी आलेले ३७ पैकी ३३ अर्ज सेवापुस्तिका जोडली नाही, या क्षुल्लक कारणावरून रद्द केल्याने ही भरती प्रक्रियाच आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये प्रसिध्द झालेल्या जाहिरातीत सेवापुस्तिकेच्या अटीचा समावेश नसतांना केवळ मर्जीतील व्यक्तीची वर्णी लागावी म्हणूनच पात्र उमेदवारांचे अर्ज बाद केल्याची धक्कादायक माहिती आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्य़ांसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक परिश्रमातून गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाली. मात्र, या विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी नोकर भरती प्रक्रिया राबवितांना मर्जीतील व्यक्तींच्या नियुक्तीचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त कारभारामुळे मुनगंटीवार यांच्या विद्यापीठ स्थापनेच्या हेतूलाच हरताळ फासला गेला असून विद्यापीठाची नको तितकी बदनामी होत आहे. कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी जूनमध्ये गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, वाणिज्य व इतिहास या पाच विषयांतील सहायक प्राध्यापकांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाल्याने त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात येऊ नयेत, असे लेखी पत्र नागपूर विभाग उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी दिल्यानंतरही नियुक्तीपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे निवडलेल्या सर्व सहायक प्राध्यापकांची वेतननिश्चिती उच्चशिक्षण सहसंचालकांनी प्रलंबित ठेवलेली आहे.

ही पाश्र्वभूमी असतांनाच कुलसचिव व लेखाधिकारीपदाची भरती पक्रिया पारदर्शक पध्दतीने न राबविता स्वमर्जीतील डॉ. झाकीर जावेद खान यांची कुलसचिवपदी नियुक्ती व्हावी म्हणून ३७ पैकी ३३ अर्ज केवळ सेवापुस्तिका जोडली नाही, या एका कारणास्तव रद्द केले, असा आरोपही होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या ऑगस्टमध्ये सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द कुलसचिव, लेखाधिकारी व ग्रंथपाल या तीन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार कुलसचिवपदासाठी २७, लेखाधिकारीपदासाठी १०, तर ग्रंथपालपदासाठी १२ अर्ज आले होते. या अर्जांच्या छाननीनंतर कुलगुरूंच्या अर्ज पडताळणी समितीचे डॉ.अनिल ढगे, डॉ. बारहाते व डॉ. जयराम खोब्रागडे यांनी ३७ अर्जापैकी तब्बल ३३ अर्ज केवळ सेवापुस्तिका जोडली नाही, या कारणावरून रद्द केले, तर लेखाअधिकारीपदासाठी ९ अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान, आता या सर्व उमेदवारांनी कुलगुरूंविरोधात दंड थोपटले आहेत. वृत्तपत्रातील जाहिरातींमध्ये ही अट नसल्याने आम्ही सेवापुस्तिका जोडली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, कुलसचिवपदासाठी पात्र ३ उमेदवारांना ३ जानेवारी २०१७ ला मुलाखतीसाठी बोलविण्यात आलेले आहे. यात डॉ. झाकीर जावेद खान, डॉ. चंद्रमौली सुदर्शन अमुदला व डॉ. ईश्वर श्रावण मोहुर्ले यांचा, तर लेखाधिकारीपदासाठी केवळ डॉ. ईश्वर श्रावण मोहुर्ले यांचाच समावेश आहे. याचाच अर्थ डॉ. ईश्वर मोहुर्ले यांची नियुक्ती निश्चित आहे. त्यामुळे कुलसचिवपदासाठी केवळ दोन नावे राहतील. यातील डॉ. झाकीर खान यांची नियुक्ती करणे हा कुलगुरूंचा उद्देश स्पष्टपणे समोर आला आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी डावलण्यात आलेल्या उमेदवारांनी केली आहे.

कुलसचिवपदाच्या भरती प्रक्रियेशी संबंध नाही

यासंदर्भात कुलगुरूंशी संपर्क साधल्यावर कुलसचिवपदाच्या भरती प्रक्रियेशी आपला काही एक संबंध नाही. ही संपूर्ण प्रक्रिया कुलसचिव कार्यालयातून होत असल्याने त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले. विद्यापीठाचे प्र.कुलसचिव दीपक जुनघरे यांच्याशी संपर्क साधला असता, सेवापुस्तिकेसोबतच ज्या कारणांनी अर्ज रद्द केले ती कारणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेली आहेत. साहेब, अर्थात कुलगुरूंनी बोलाविले आहे. त्यांच्याशी चर्चा करून काय उत्तर द्यायचे, ते सांगतो, असे ते म्हणाले आणि भ्रमणध्वनी बंद केला. मात्र, त्यानंतर जुनघरे यांच्याशी संपर्क साधूनही त्यांनी भ्रमणध्वनीवर घेतला नाही.