11 August 2020

News Flash

दिलासादायक! महाराष्ट्रातील माता मृत्यूदरात घट

राज्यांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

करोनाचा प्रादुर्भाव जाणवत असताना राज्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या (एसआरएस) आज प्रकाशित झालेल्या अहवालात मातामृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवत सातत्य राखले आहे. राज्यात आरोग्य विभागामार्फत मातामृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने हे यश मिळविले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. केंद्रीय नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या २०१६-१८ च्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या यादीत पहिल्या स्थानावर केरळ असून त्याचा दर ४३ नोंदविला गेला आहे. तर महाराष्ट्राचा मातामृत्यू दर ४६ आहे. या वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील राज्यांच्या माता मृत्यूदरामध्ये असणारे अंतर कमी झाले असून ही साऱ्यांनाच दिलासा देणारी बाब आहे.

गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राचा मातामृत्यू दर ६८ वरून ६१ आणि नंतर ५५ इतका होता. यंदाच्या अहवालात तो दर ४६ असा नोंदविण्यात आला आहे. या यादीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये केरळ (४३), महाराष्ट्र (४६), तामिळनाडू (६०), तेलंगणा (६३), आंध्रपदेश (७४) या राज्यांचा समावेश आहे. या सर्वेनुसार देशाचा माता मृत्यूदर हा ११३ असून २०१५-१७ च्या तुलनेत त्यात ७.४ टक्क्यांनी घट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने माता मृत्यूदर कमी करण्यासाठी नेमून दिलेल्या शाश्वत विकास ध्येयाची पूर्तता देशातील पाच राज्यांनी केली असून त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाल्याने माता मृत्यूदर कमी!

“राज्यातील गर्भवती मातांच्या आणि नवजात अर्भकांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात २४८ प्राथमिक संदर्भ सेवा केंद्र (फर्स्ट रेफरल युनिट) सुरू करण्यात आले असून त्यामाध्यमातून संस्थात्मक बाळंतपण वाढविण्यावर भर दिला जात आहे. माहेर योजनेच्या माध्यमातूनही दुर्गम भागात माता मृत्यू रोखण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांघिक भावनेतून केलेल्या कामाचे हे यश आहे”, असे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 5:45 pm

Web Title: good news for maharashtra as survey observes decrease in maternal mortality rate in state vjb 91
Next Stories
1 पालघर झुंडबळी प्रकरण; सीआयडीच्या आरोपपत्रातून घटनेमागील कारण आलं समोर
2 यवतमाळ : प्रतिबंधित गुटख्यासह ८० लाखांचा साठा ‘बॉयलर’मध्ये नष्ट
3 “उद्धव ठाकरेंवर सामनामधूनच टीका करण्यासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली”
Just Now!
X