ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात करोनाच्या टाळेबंदीत‘ गुड न्यूज’ अर्थात आनंदाची बातमी आली असून माया(टी-१२) नावाच्या प्रसिध्द वाघिणीने पाच पिल्लांना जन्म दिला आहे. आता ही पिल्लं तीन महिन्यांची झाली असून सुखरूप असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने कळविले आहे.

करोनाच्या टाळेबंदीचा फटका सर्वांसोबत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालाही बसला आहे. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकल्प बंद असल्याने व्याघ्र पर्यटन पूर्णत: बंद आहे. ताडोबाची ऑनलाईन व्याघ्र सफारी आणि ताडोबाचे संरक्षण सुरू आहे. वाघिणीचा मृत्यू आणि मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण करणारा वाघ जेरबंद या दोन घटनांमुळे ताडोबा चर्चेत आला असतांनाच आता करोनाच्या टाळेबंदीत ताडोबातील प्रसिध्द वाघीण माया हिने पाच पिल्लांना जन्म दिला असल्याची गुड न्यूज समोर आली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन.आर.प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडोबातील एका कर्मचाऱ्याला माया ही वाघीण तिच्या पाच पिल्लांसोबत आनंदाने खेळत असल्याचे चित्र जंगलात दिसले. त्याने ही माहिती ताडोबा व्यवस्थापनाला दिली. तेव्हापासून माया या वाघिणीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. क्षेत्र संचालक प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार माया वाघीण व तिचे पाचही पिल्ल अतिशय सुरक्षित आहेत. भारतात करोनाची टाळेबंदी २४ मार्च रोजी जाहीर झाली. त्यापूर्वी एक दिवसाचा बंद पाळण्यात आला होता. त्याच दरम्यान माया वाघिणीने या पिल्लांना जन्म दिला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातही ताडोबातील एका पानवठ्याजवळ माया व तिच्या पिल्लांना बघितल्या गेले आहे. टाळेबंदीत माया वाघिणीने पाच पिल्लांना जन्म दिल्याने ताडोबा व्यवस्थापनात आनंदाचे वातावरण आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प करोनाच्या टाळेबंदीने मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. मात्र ताडोबा बफर १ जुलै पासून पर्यटकांसाठी खुला करावा अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर वन्यजीव विभाग गांभिर्याने विचार करित आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असली तरी सध्यातरी असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.