महाजनादेश यात्रेदरम्यान वर्धा येथे मुख्यमंत्र्यांचा खुलासा

वर्धा : भाजपमध्ये सुरू असलेली महाभरती बंद केलेली नाही. चांगले लोक येत असतील तर जरूर पक्षात घेऊ, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी रात्री वर्धा मुक्कामी पोहोचली. सकाळी यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील पहिली पत्रकार परिषद जिल्हा परिषद सभागृहात झाली. उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महाभरती झाल्यानंतर विदर्भातून यात्रा सुरू होताच ती बंद झाल्याची घोषणा का करावी लागली, असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, इच्छा असलेल्या सगळय़ांनाच पक्षात घेऊ शकत नाही.

जे लोकप्रिय आहेत, ज्यांना जनाधार आहे अशांसाठी अजूनही भरती सुरू आहे. या भरतीविषयी भाजपमध्ये कुरबुर सुरू असल्याच्या शंकेबाबत मुख्यमंत्री म्हणाले, महाभरती वगैरे असा काही प्रकार नाही. मुळात आमच्या पक्षाच्या तुलनेत इतर पक्षांतील केवळ अर्धा टक्के नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.

तडजोड करावीच लागणार :

भाजप आणि शिवसेनेने एकत्रित लढण्याचे पक्के केले आहे. त्यामुळे जागावाटपात तडजोड करावीच लागणार. नागपुरातील सर्व जागा भाजपच्या ताब्यात आहेत, तर कोकणात सेनेचे प्रभुत्व आहे. युती करायची असल्याने दोन जागा मिळणार, तर दोन सोडाव्या लागणार, हे चालायचेच, असे  मुख्यमंत्री म्हणाले.

ईव्हीएमवर नव्हे, हा तर जनतेवर अविश्वास :

ईव्हीएमबाबत विरोधकांच्या शंका निराधार आहेत. याच पद्धतीने गेल्या दहा वर्षांतील निवडणुकीत तेसुद्धा विजयी झाले. ईव्हीएमवर अविश्वास म्हणजे जनतेवरच अविश्वास दाखवणे होय. त्यांनी दोष न काढता आत्मचिंतन केले पाहिजे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.