गडचिरोली जिल्ह्य़ात प्रथमच खरिपाचा पेरा २ लाख हेक्टरवर

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ात यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पिकावर रोगाचा प्रादुर्भावही नसल्यामुळे धान, सोयाबीन, कापूस व तूर या प्रमुख पिकांच्या उत्पन्नात समाधानकारक वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविली आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत प्रथमच गडचिरोलीत खरीप क्षेत्राचा पेरा २ लाख हेक्टरवर गेला असून धान उत्पादनात भरीव वाढ शक्य आहे.

मागील तीन वर्षांंपासून या दोन्ही जिल्ह्य़ात पावसाअभावी शेतीची अवस्था दयनीय होती. शेतकरी हवालदिल झालेला होता. मात्र, त्या तुलनेत यंदा चांगला आणि समाधानकारक पाऊस झाला. परिणामत: यंदा शेतीत चांगले पिके दिसत आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात एकूण खरीपाच्या क्षेत्रात ४ लाख ३५ हजार ८०८ हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात धान १ लाख ६९ हजार ३८४ हेक्टर, ज्वारी १ हजार ८२०२, तूर ३४ हजार ४, सोयाबीन ६६ हजार ६८, तर कापसाची १ लाख ६२ हजार ९५ हेक्टरवर पेरणी, तर उर्वरीत अडीच हजार हेक्टरवर इतर पिकांची लागवड करण्यात आली. कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकार वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून व जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यावर ऑगस्टमध्ये काही दिवस पावसाने दडी मारली, त्यामुळे पिके करपायला सुरुवात झाली, परंतु आता पुन्हा पाऊस झाल्याने पिकस्थिती समाधानकारक आहे, तसेच यंदा लष्करी अळी किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव सध्या तरी कमी आहे, त्यामुळे यंदा चांगले आणि समाधानकारक उत्पन्न होईल, असा अंदाज आहे. या भागातील शेतकरीही सध्या तरी पिकांची स्थिती चांगली आहे, असेच सांगत आहेत. जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पिकांना गरज होती तेव्हाच पाऊस झाल्याने गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात निश्चितच वाढ होईल, असे सांगितले, तर येथील व्यापारी शिव सारडा यांनी यंदा पिके चांगले येण्याचा अंदाज वर्तवितांनाच दिवाळीनंतर बाजारात आर्थिक तेजी येईल, अशी शक्यता बोलून दाखविली. शेतकऱ्यांकडे पैसे आले, तर ते बाजारातच येतील आणि त्याचा फायदा सर्वानाच होईल, असेही ते म्हणाले.

गडचिरोली जिल्ह्य़ातही यंदा चांगली पिकस्थिती आहे. ३० ऑगस्टपर्यंत २ लाख १ हजार १५८ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ७९ हजार ७०५ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. या जिल्ह्य़ात गेल्या काही वर्षांत पीक पध्दतीत बदल झाला असून खरीप हंगामात भात, मका, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सुर्यफूल, तीळ, सोयाबीन, कापूस, ऊस आदी पिकांची लागवड शेतकरी करू लागले आहेत. सिंचनाची सुविधा नसतांनाही केवळ गडचिरोलीत यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पन्नात कमालीची वाढ होईल, अशी आशा जिल्हा कृषी अधीक्षक अनंत पोटे यांनी व्यक्त केला, तर तेथील शेतकऱ्यांनाही यंदा धानाचे चांगले उत्पादन होईल, असा विश्वास आहे. गडचिरोलीसह कुरखेडा, आरमोरी, चामोर्शी, एटापल्ली, या धानपट्टय़ात भरघोस उत्पन्न येईल, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यंदा आतापर्यंत तरी करपा किंवा इतर कोणताही रोग पिकांवर झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आनंदात असल्याचे चित्र येथे दिसत आहे.