News Flash

रत्नागिरी-सिंधुदुर्गची सरासरी दीड हजार मिलिमीटरवर

जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून कोकणात मान्सूनचा पाऊस खऱ्या अर्थाने सुरू झाला

यंदा कोकणावर वरुणराजाने उशिरा का होईना, कृपादृष्टी दाखवल्यामुळे अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत या दोन जिल्ह्यांमधील पावसाची सरासरी दीड हजार मिलिमीटरवर पोचली आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून कोकणात मान्सूनचा पाऊस खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि त्यानंतर सलग सुमारे दोन आठवडे त्याचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मागील कसर भरून काढत गेल्या १ जूनपासून बुधवारअखेर एकूण सरासरी १७३०.३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण ११०७.८५ मिलिमीटर होते. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ५१ टक्के आहे.  शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चालू मोसमात आत्तापर्यंत १७१०.९३ मिलिमीटर पाऊस पडला असून गेल्या वर्षी याच मुदतीपर्यंत फक्त ९७७.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सिंधुदुर्गच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ५२.८० टक्के आहे. जिल्ह्यातील मालवण (१९५६ मिमी), सावंतवाडी (१८८८), देवगड (१७७६), कणकवली (१७४६), वेंगुर्ले (१६७४), कुडाळ (१६२३) आणि दोडामार्ग (१५६८मिमी) या तालुक्यांनी दीड हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद केली, तर वैभववाडीही थोडासाच मागे (१४५६) राहिला आहे. या दमदार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यंमधील पाणीसाठय़ांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून भातशेतीच्या दृष्टीनेही हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरला आहे. मंगळवारपासून मात्र दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून बुधवारी  काही भागांमध्ये तर स्वच्छ ऊनही पडले. या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यत पावसाचे प्रमाण थोडे कमी असले तरी तेथेही या मोसमात एकूण सरासरी १३४१ मिलिमीटर (४३.२४ टक्के)पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी मुरूड (१७४२ मिलिमीटर), तळा (१६७९), रोहा (१६८६), श्रीवर्धन (१५८३), म्हसळा (१५६२) आणि सुधागड (१५५५ मिमी)या  ६ तालुक्यांमध्ये दीड हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्याच्या काही भागात गेल्या आठवडय़ात अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात फक्त ९४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.     यंदाच्या पावसाळ्याचे अजून सुमारे सव्वादोन महिने बाकी असून या काळात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कोकणात यंदा विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांना इशारा

दरम्यान आगामी २४ तासांत किनारपट्टीवर ताशी सुमारे ४५ ते ५५ मिलिमीटर वेगाचे वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे समुद्र खवळलेला राहणार आहे. म्हणून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:11 am

Web Title: good rainfall in ratnagiri
Next Stories
1 ‘खात्री केल्याशिवाय पोलिस खबऱ्यांना ठार करू नका’
2 रोहयोतील विशिष्ट कामांना यंत्र वापराची परवानगी
3 राज्यातील पावसाचा जोर कमी होणार, पुणे हवामान खात्याने वर्तविला अंदाज
Just Now!
X